अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन विराजमान होणार हे शनिवारी रात्रीच स्पष्ट झालं होतं. बहुमत मिळवत जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. विजयी झाल्यानंतर जो बायडन यांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या जनतेला संबोधित केलं. दरम्यान दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी जो बायडन यांच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. ‘मला डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराजयाने आनंद झाला आहे. तेथील लोकांना व्हाइट हाऊस सुरक्षित ठेवण्यासाठी उंदीर मारण्याच्या औषधाचा वापर करुन सॅनिटाइझ करावे लागणार’ या आशयाचे ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले. बायडेन यांना ५०.५ टक्के म्हणजे ७४४७८३४५ मते, तर ट्रम्प यांना ४७.७ टक्के म्हणजे ७०३२९९७० मते मिळाली आहेत. पेनसिल्वेनियात अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले. तेथील २० प्रातिनिधिक मते त्यांनी मिळविली. नॉर्थ कॅरोलिनात ट्रम्प, तर अ‍ॅरिझोना, नेवाडात बायडेन यांनी विजय मिळविला.

कमला हॅरिस यांनी इतिहास घडवला आहे. त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या आहेत. त्याचबरोबर त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी उपाध्यक्ष आहेत. बायडेन आणि हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारीला होणार आहे.