राम गोपाल वर्मा आणि त्याचे चित्रपट बॉलीवूडसाठी नेहमीच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असतो. गुन्हेगारी विश्व असो किंवा भुताटकीवर आधारित चित्रपट असो. या सर्वच चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. आता राम गोपाल वर्माचे पुढील ‘लक्ष्य’ कुख्यात तस्कर वीरप्पन असून ‘किलिंग वीरप्पन’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे.
वीरप्पनवरील हा चित्रपट एकाच वेळी कन्नड, तेलुगू, तामिळ आणि हिंदी अशा चार भाषेत तयार केला जाणार आहे. वीरप्पनच्या जीवनाविषयी रामू वर्मा यांना प्रचंड कुतूहल होतेच. त्याच्यावर चित्रपट तयार करायचा हे डोक्यात होतेच. चित्रपटासाठी चांगली संहिता मिळाल्यानंतर त्याने वीरप्पनवर चित्रपट तयार करण्याचे नक्की केले.
काही वर्षांपूर्वी शिवराजकुमार यांचे वडील आणि अभिनेते राजकुमार यांना वीरप्पनने पळवून नेले होते. त्यामुळे वीरप्पनच्या भूमिकेसाठी राजकुमार यांचाच मुलगा व कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार शिवराजकुमार याची निवड करण्यात आली आहे. हा चित्रपट प्रामुख्याने वीरप्पनच्या जीवनावर नाही तर त्याला मारणाऱ्या व्यक्तीवर आधारित आहे.
एकेकाळी वीरप्पनने खूप मोठी दहशत निर्माण केली होती. कर्नाटक आणि तामिळनाडू शासनाला त्याने सळो की पळो करून सोडले होते. अखेर २००४ मध्ये पोलीस चकमकीत तो मारला गेला होता. तामिळनाडू, केरळ व कर्नाटक शासनाने त्याला पकडण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले होते, मात्र एका व्यक्तीकडून तो मारला गेला. ‘वीरप्पन’ चित्रपटात प्रामुख्याने या घटनेला महत्त्व देण्यात आले आहे.
रामू वर्मा सध्या चित्रपटाच्या लेखनात व्यग्र असून वीरप्पनबाबत उपलब्ध असलेली पुस्तके, व्हिडीओ, वृत्तपत्रातून आलेल्या बातम्या या सगळ्यांचा आधार या चित्रपटासाठी त्यांनी घेतला आहे. चित्रपटातील अन्य भूमिकांसाठी लवकरच कलाकारांची निवड केली जाणार आहे. वीरप्पनला मारणाऱ्या व्यक्तीची भूमिका कोण करतोय हे रामू वर्माने अद्याप जाहीर केलेले नाही. चित्रपटाचा तो ‘सस्पेन्स’ त्याने तसाच ठेवला आहे.