निर्माता, दिग्दर्शक राम गोपाल वर्माने करोना व्हायरसची लागण झाल्याचं ट्विट करत नेटकऱ्यांना एप्रिल फूल केलं. ‘माझ्या डॉक्टरने मला आता सांगितलं की मी करोना पॉझिटिव्ह आहे’, असं पहिलं ट्विट करत त्याने सर्वांना धक्का दिला. त्यानंतर थोड्या वेळाने लिहिलं, ‘तुमची निराशा केल्याबद्दल माफी मागतो. पण आता डॉक्टर म्हणाले की मी एप्रिल फूल करत होतो. ही त्यांची चूक आहे माझी नाही.’ देशभरात करोना व्हायरसची दहशत पसरली असताना राम गोपाल वर्माने अशी थट्टा करणं अजिबात योग्य नाही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राम गोपाल वर्माच्या ट्विटवर नेटकरी संतापले असून जबाबदार नागरिकासारखे वागा, असा सल्ला त्यांना दिला आहे. जगभरात करोना व्हायरसमुळे जवळपास ४० हजारांहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागत असताना अशी मस्करी केल्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी, अशीही मागणी नेटकऱ्यांनी केली. नेटकऱ्यांच्या या संतप्त प्रतिक्रिया पाहून थोड्या वेळाने राम गोपाल वर्माने माफीचंही ट्विट पोस्ट केलं. ‘मी फक्त थोडी मस्करी करून वातावरण हलकंफुलकं करू पाहत होतो. पण यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’, असं त्याने ट्विटरवर लिहिलं.

करोना व्हायरसविषयी अफवा पसरविणारे संदेश सोशल मीडियावर प्रसारित करून नागरिकांना भयभीत करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशातच ‘एप्रिल फूल’च्या निमित्ताने अफवा पसरविण्याचे प्रकार दुपटीने वाढायला नको म्हणून अफवा पसविणारे संदेश पाठविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला होता. त्यामुळे आता या ट्विटसाठी राम गोपाल वर्मावर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.