साक्षी तन्वर आणि राम कपूर यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. लवकरच हे दोघंही एकता कपूरच्या वेब सिरिजमध्ये एकत्र दिसणार आहेत. बडे अच्छे लगते है या मालिकेतली त्यांची ही जोडी प्रेक्षकांना फार पसंत पडली होती. आता हे दोघे ‘कर ले तू भी मोहब्बत’ या वेब सिरिजमध्ये एकत्र दिसणार आहे. वेब सिरिजची निर्मिती एकता कपूरच्या एएलटी बालाजी या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. नुकताच या वेब सिरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. ही वेब सिरिज एकूण १४ भागांची असणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती एएलटी बालाजी यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे.

या वेब सिरिजमध्ये राम कपूर सेलिब्रेटी करण खन्नाची व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याचे फार चाहतेही असतात. तर व्यसनाधिनतेच्या विरोधात लढणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्तीच्या रुपात साक्षीला दाखवण्यात आले आहे. अजूनपर्यंत कथेबद्दल फार काही कळाले नसले तरी दोघंही वेगवेगळ्या पाश्वभूमीतून येणारे असल्यामुळे या वेब सिरिजची कथा ही थोड्या फार फरकाने ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेसारखीच असेल असे प्रथमदर्शनी तरी वाटते आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना साक्षी म्हणाली की, ‘प्रेक्षकांनी तिच्यावर आतापर्यंत खूप प्रेम केले. त्यातही लोकांना राम आणि साक्षीची जोडी फार आवडली होती. प्रेक्षकांनी एकताला आमची जोडी पुन्हा एकदा एकत्र आणण्याची मागणी केली होती, त्यामुळेच एकताने आम्हाला घेऊन ही वेब सिरिज सुरू केली.’ तर रामने सांगितले की, प्रेक्षक आम्हाला पुन्हा एकत्र बघून अजिबात निराश होणार नाहीत. हे दोघंही टीव्हीपेक्षा या वेब सिरिजमध्ये बोल्ड, उत्साही आणि तरुण दाखवण्यात येतील.

रामने त्याची आणि साक्षीच्या केमिस्ट्रीबद्दल सांगताना म्हटले की, ‘साक्षी फार गुणी अभिनेत्री आहे. आम्ही दोघंही एकमेकांचा आदर करतो. आम्ही मित्र तर आहोतच शिवाय एकमेकांच्या कामाचे कौतुकही करत असतो. जर तुम्ही अशा माणसांबरोबर काम करता जे त्यांचे काम चांगल्यात चांगले कसे होईल याकडे लक्ष देतात तर तुम्हालाही काम करण्याचा अधिक आनंद मिळतो.’