आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी काही ठराविक भूमिकांसाठी किंवा काही विशिष्ट कारणांसाठी वजन कमी केले आहे. आता या यादीत अभिनेता राम कपूरचे नाव समाविष्ट झाले आहे. ‘बडे अच्छे लागते है’ या मालिकेतून हा अभिनेता घराघरांत पोहोचला होता. आधी त्याचे वजन जवळपास १३० किलो होते. आता डाएट आणि व्यायामामुळे त्याने २५ ते ३० किलो वजन कमी केले आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून वजन कमी केल्याचे बरेच फोटो शेअर केले आहेत.

दोन वर्षांपूर्वी रामने या फिटनेस प्रवासाला सुरुवात केली होती. पुणे मिररला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने असे सांगितले की, “मी दिवसाला जवळपास २ तास व्यायाम करायचो. उपाशीपोटी रोज एक तास मी वजन उचलण्याच्या व्यायाम करायचो तर, झोपण्याच्या आधी कार्डिओ व्यायाम करायचो.” त्याने असेही सांगितले की, “ठरलेल्या आठ तासांमध्ये मी विशिष्ट आहार घ्यायचो. त्यानंतर सोळा तास काहीच खायचो नाही. मी दुग्धजन्य पदार्थ, तेलकट पदार्ध, साखर या गोष्टी पूर्णच सोडून दिल्या होत्या.”

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी राम कपूर एक उत्तम उदाहरण आहे. पण, यासाठी डॉक्टर आणि आहारतज्ञांचा योग्य सल्ला घेतला पाहिजे. त्याने अवलंबलेली पद्धत प्रत्येकालाच लागू पडेल असे नाही. वजन कमी करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणं जास्त महत्त्वाचं आहे.