‘रमा माधव’ हा चित्रपट केवळ ऐतिहासिक नसून मानवी भावभावना आणि नात्यांचा शोध चित्रपटातून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर गाजलेल्या ‘स्वामी’ या मराठी मालिकेचा हा मोठय़ा पडद्यावरील अवतार ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘स्वामी’ मालिकेत रमाबाईंची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनीच या चित्रपटाची पटकथा लिहिली असून दिग्दर्शनही केले आहे.
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या मृणालने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला चांगले यश मिळाले. आता ‘रमा माधव’च्या निमित्ताने पुन्हा एकदा दिग्दर्शनाचे शिवधनुष्य ती पेलणार आहे. थेट आपल्या पहिल्या भूमिकेशी नाते जोडणाऱ्या या चित्रपटाबद्दल बोलताना या चित्रपटातही रमाचा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे मृणालने ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले. १२ वर्षांच्या रमेचा १५ वर्षांच्या माधवाशी विवाह होतो. तेव्हापासून ते माधवराव पेशवे आणि रमाबाई पेशवे यांच्या अखेपर्यंतचा प्रवास चित्रपटात दाखविला आहे. पण चित्रपटातील बराचसा भाग हा रमा-माधव यांच्या लहान वयातील प्रेमकथेचा आहे. चित्रपटासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अन्य इतिहासतज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले असल्याचेही तिने सांगितले.
 दूरदर्शनवरून सादर झालेल्या ‘स्वामी’ मालिकेत मृणालने ‘रमा’ तर रवींद्र मंकणी यांनी ‘माधव’ची भूमिका साकारली होती. मात्र आता ‘रमा माधव’ या चित्रपटात हे दोघेही गोपिकाबाई आणि नानासाहेब पेशवे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिवंगत संगीतकार आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेला हा अखेरचा चित्रपट. दिवंगत कवी-गीतकार सुधीर मोघे यांनी लिहिलेली दोन गाणी चित्रपटात आहेत. चित्रपटाचे संवाद लता रवींद मनस्वीनी यांचे आहेत. चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने ‘राघोबादादा’ तर अमोल कोल्हेने ‘सदाशिवराव भाऊ’ साकारला आहे. चित्रपटाच्या निमित्ताने ‘रमा माधवा’च्या भूमिकेत नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. मात्र या जोडीचे नाव अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
चित्रपटात ‘नानासाहेब पेशवे’ यांची भूमिका करणारे रवींद्र मंकणी म्हणाले, इतिहासातील तीन पेशवे साकार करण्याचे भाग्य मला मिळाले. ‘माधवराव’, ‘बाजीराव-दुसरा’ आणि आता ‘नानासाहेब’ असे तीन पेशवे मी केले. या तीनही भूमिका करताना ऐतिहासिक पुस्तके, बखरी आणि दस्तऐवज वाचून त्या व्यक्ती जाणून घेतल्या आणि त्या अभ्यासातून मग भूमिका साकारली. ऐतिहासिक व्यक्तिरेखा रंगविणे हे एक आव्हान असते, पण ते पेलण्याचा आपण प्रयत्न के ल्याचे मंकणी यांनी सांगितले.
उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्य
चित्रपटाची गरज म्हणून ‘रमा माधव’ मध्ये उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्य पाहायला मिळणार आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शिका सरोज खान यांनी दिग्दर्शित केलेल्या या गाण्यावर हिंदीतील अभिनेत्री आदिती राव हैदरची अदाकारी पाहायला मिळणार आहे. राजीव जैन हे सिनेमॅटोग्राफर असून कला दिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे आहे.