८० च्या दशकात केबल, डिश टीव्ही हे प्रकार नव्हते. त्याकाळी केवळ दूरदर्शन आणि डीडी मेट्रो या दोनच वाहिन्यांवर प्रेक्षकांचे मनोरंजन व्हायचे. या वाहिन्यांनी त्यावेळी ‘महाभारत’ आणि ‘रामायण’सारख्या पौराणिक कथा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. या मालिकांपैकी रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका बरीच गाजली. मालिकेत अरुण गोविल, सुनील लहरी, दीपिका चिखालिया, अरविंद त्रिवेदी, दारा सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

वाचा : राणा डग्गुबतीच्या ‘हाथी मेरे साथी’चा फर्स्ट लूक

आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी सीतेची भूमिका साकारली. पण दीपिका चिखालियाप्रमाणे कोणीच ती व्यक्तिरेखा साकारू शकली नाही. मालिकांसोबत त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले. ‘सुन मेरी लैला’ (१९८३), ‘घर का चिराग’ (१९८९) आणि राजेश खन्ना यांच्यासोबत ‘रुपये दस करोड’ (१९९१) या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्यानंतर त्या रुपेरी पडद्यापासून दुरावल्या. आता त्या चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘गालिब’ या आगामी चित्रपटात दीपिका दिसणार असून, त्यामुळेच त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. चित्रपटाची कथा अफजल गुरुचा मुलगा गालिब याच्यावर आधारित आहे. यात त्या गालिबच्या आई तबस्सुमची भूमिका साकारतील.

वाचा : ..म्हणून किरण खेर चित्रपटांपासून दुरावल्या

अलाहाबाद आणि वाराणसी येथे नुकतेच चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. त्यावेळी दीपिका म्हणाल्या की, ‘चित्रपटाची कथा अफजल गुरुवर आधारित नसून, त्यातील व्यक्तिरेखा काहीशी त्याच्याशी मिळतीजुळती आहे. ही खरंतर एका आई आणि मुलाची कथा आहे. एखाद्या दहशतवाद्याला फाशी दिल्यानंतर याचा त्याची पत्नी आणि मुलं यांच्यावर काय परिणाम होतो’, हे चित्रपटात पाहायला मिळाले.

जवळपास २५ वर्षे उलटूनही लोक दीपिका यांना सीतेच्या भूमिकेमुळेच ओळखतात. यावर त्या म्हणाल्या की, आजही लोक मला सीताच समजतात. मला याची सवय झाली असून ती माझी दुसरी ओळखच झाली आहे. मी आजही रामायणमधील माझ्या सहकलाकारांच्या संपर्कात आहे.