करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषीत करण्यात आली आहे. या काळात सोशल मीडियावर लोकांकडून ८०च्या दशकातील रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ पुन्हा दाखवण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार २८ मार्चपासून सकाळी ९ आणि रात्री ९ असे दिवसातून दोन वेळा रामायण मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. पण आता सोशल मीडियावर याच मालिकेशी संबंधीत दूरदर्शन वाहिनीला प्रश्न विचारले जात आहेत.

चित्रपट व्यापार विश्लेषक अनंत विजयने एका पाठोपाठ एक ट्विट करत अनेक प्रश्न विचारले आहेत. ‘डीडी नॅशनल रामायण दाखवण्याच्या बाबतील निष्काळजी पण करत आहे. तरी देखील प्रकाश जावडेकर मालिका पाहत आहेत. रामनवमीच्या दिवशी प्रत्येक घरात राम जन्माचा उत्साव साजरा केला जात होता तर दुसरीकडे दूरदर्शनवर रामायण मालिकेत दशरथावर अंत्यसंस्कार केले जात होते’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.

त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर देखील अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. एका यूजरने काल बालीचा पूर्ण संवाद देखील दाखवला नाही असे म्हटले होते.

त्यांच्यावर विजय यांनी लगेच ट्विट करत म्हणजे काल निष्काळजीपणा करण्यात आला असे म्हटले आहे.

रामायण ही मालिका ऑन-एअर येताच या मालिकेने टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढले. इतकेच नव्हे तर २०१५ पासून आतापर्यंत प्रसारित झालेल्या जनरल एंटरटेनमेंट कॅटगरीच्या (GEC) मालिकांतही रामायण मालिका सर्वोत्तम ठरत आहे. लॉकडाउनच्या काळात रामायणासोबत ८० आणि ९०च्या दशकातील अनेक मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत. यामध्ये ‘महाभारत’, ‘शक्तिमान’, ‘ब्योमकेश बक्षी’, ‘सर्कस’, ‘फौजी’, ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकांचा समावेश आहे.