लॉकडाउनमध्ये रामायण ही लोकप्रिय पौराणिक मालिका पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर त्यातील कलाकारांची चर्चा सर्वत्र झाली. या मालिकेत भूमिका साकारणारे कलाकार आता कसे दिसतात, ते आता काय करत आहेत, याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. रामायणात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांनी फेसबुकवर नुकतीच एक पोस्ट लिहिली असून ‘रिअल लाइफमधल्या रामाशी’ भेट कशी झाली, याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.

दीपिका यांची फेसबुक पोस्ट- 

सीतेची रामाशी भेट कशी झाली हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण मी माझ्या रिअल लाइफमधल्या रामाशी कशी भेटले हे सांगू इच्छिते. १९६१ पासून माझ्या पतीचे कुटुंबीय पारंपरिक भारतीय सौंदर्य प्रसाधनांचं उत्पादन व विक्री करत आहे. ‘शिंगार’ असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. ‘सुन मेरी लैला’ या माझ्या पहिल्यावहिल्या चित्रपटात मी एका जाहिरातीसाठी मॉडेलिंग करताना दिसते. ती जाहिरात शिंगार काजळची होती. या जाहिरातीचं शूटिंग बघण्यासाठी हेमंत सेटवर आले होते. तेव्हा आमची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर आम्ही आपापल्या आयुष्यातील कामात व्यस्त झालो पण दोघांची पुन्हा भेट होईपर्यंत पहिल्या भेटीचा विचार मनातून जात नव्हता. क्रमश:..

दीपिकाने हेमंत टोपीवाला यांच्याशी १९९१ मध्ये लग्न केलं. हेमंत आणि दीपिकाच्या लग्नात बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना यांनीदेखील हजेरी लावली होती. लग्नानंतर दीपिकाने अभिनयाच्या प्रवासाला पूर्णविराम लावला. दीपिकाला दोन मुली असून निधी आणि जूही अशी त्यांची नावं आहेत.