करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. या काळात सोशल मीडियावर लोकांकडून ८०च्या दशकातील रामानंद सागर यांची लोकप्रिय रामायण मालिका सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार २८ मार्चपासून सकाळी ९ आणि रात्री ९ असे दिवसातून दोन वेळा रामायण मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. ही मालिका ऑन-एअर होताच या मालिकेने टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढले.

रामायण मालिकेच्या ‘टीआरपी’बाबत बोलायचे झाले तर सध्या कोणतीही इतर मालिका त्याला टक्कर देऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर २१५ पासून आतापर्यंत प्रसारित झालेल्या जनरल एंटरटेनमेंट कॅटगरीच्या (GEC) मालिकांतही रामायण मालिका सर्वोत्तम ठरत आहे. रामायण मालिकेच्या टीआरपी रेटिंगबद्दल डीडी नॅशनल चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शशी शेखर यांनी माहिती दिली.

रामायण मालिकेतील एक दृश्य

 

“मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की दूरदर्शनवर प्रसारित होणारी रामायण मालिका २०१५ पासून आतापर्यंतच्या मालिकांमधील सर्वाधिक टीआरपी मिळवणारी हिंदी मालिका ठरली आहे.” BARC च्या हवाल्याने त्यांनी हे ट्विट केले. “BARC कडून २०१५ मध्ये जेव्हापासून रेटिंग सुरू करण्यात आले आहे. तेव्हापासून दूरदर्शनसाठी रामायण मालिका एक विक्रम ठरला आहे. करोनाच्या लॉकडाउन काळात दूरदर्शन वाहिनी मोठ्या प्रमाणावर पाहिली जात आहे”, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, रामायण या जुन्या मालिकेसोबतच महाभारत, शक्तिमान, ब्योमकेश बक्षी, सर्कस, फौजी, श्रीमान श्रीमती या मालिकांचेही पुन:प्रक्षेपण केले जात आहे.