गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये ‘रामायण’ ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा दाखवण्यात आली होती. त्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. आता ही मालिका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.

या मालिकेत सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपिका चिखालिया यांनी ही बातमी दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरुन एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. त्या म्हणतात, “सांगण्यास आनंद होत आहे की रामायण पुन्हा छोट्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्येही रामायण ही मालिका दाखवण्यात आली होती. असं वाटतंय इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ही मालिका फक्त माझ्याच नाही तर हजारो परिवारांच्या आयुष्याचा फार मोठा भाग आहे. या आमच्यासोबत आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही रामायणाबद्दलची माहिती द्या.”

स्टार भारत या वाहिनीवर दररोज संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. गेल्या वर्षी जेव्हा करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, त्यावेळी लोकांना घरीच राहण्यासाठी प्रोत्साहित कऱण्याकरता रामायण मालिकेचं पुनःप्रसारण केलं होतं.

या पुनःप्रसारणानंतर काही दिवसांतच या मालिकेचा टीआरपी सर्वात जास्त वाढला होता. ७.७ कोटीहूनही अधिक लोकांनी ही मालिका पाहिल्याचं आकडेवारी सांगत होती. दूरदर्शनच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली होती.