हॉलीवूडमध्ये गाजलेला ‘२४’ हा शो भारतीय अवतारात सादर करण्याचे खूप मोठे श्रेय अभिनेता अनिल कपूरच्या नावे जमा झाले आहे. अनिल कपूरने स्वत: हॉलीवूडच्या मूळ शोमध्ये काम केले होते. आता या शोचे दुसरे पर्व ‘कलर्स’ वाहिनीवर येण्यासाठी सज्ज झाले आहे. परदेशातील गाजलेल्या मालिका भारतात आणणाऱ्या अनिल कपूरना ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन महामालिकांची निर्मिती हॉलीवूडमध्ये तिथल्या प्रेक्षकांसाठी व्हायला हवी, असे वाटते. या दोन्ही मालिका हॉलीवूड प्रेक्षकांना आवडतील, असा विश्वास अनिल कपूर यांनी व्यक्त केला आहे.
‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन्ही मालिकांचे विषय खूप सुंदर असून हॉलीवूडमध्ये त्याची निर्मिती अधिक भव्य आणि व्यापक होईल, असे आपल्याला वाटत असल्याचे अनिल कपूर यांनी स्पष्ट केले. हॉलीवूडचे निर्माते अशा वेगळ्या विषयांच्या शोधात असतात. ‘मिशन इम्पॉसिबल’चे चित्रीकरण करत असताना त्या चित्रपटाच्या लेखकांनीही आपल्याला अशी एक भव्य कथा हवी आहे जी भारतात चित्रित करता येईल असे सांगितले होते. त्या वेळी आपण मोगल बादशाह अकबराची कथा त्यांना सुचवली होती. ‘गेम ऑफ थॉर्नस’सारखे चित्रपट ज्या भव्य स्तरावर हॉलीवूडमध्ये तयार केले जातात ते पाहता आपल्याकडच्या ऐतिहासिक-पौराणिक कथांवर चांगले हॉलीवूडपट तयार होऊ शकतील, असे मत अनिल कपूर यांनी व्यक्त केले. गेल्या वर्षी अनिल कपूर यांनी ‘वेलकम बॅक २’ केला होता. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर ‘झी सिनेमा’वर होणार आहे. या वर्षी चित्रपटांना बाजूला सारत अनिल कपूर पुन्हा आपल्या महत्त्वाकांक्षी ‘२४’ मालिकेच्या माध्यमातून छोटय़ा पडद्यावर दिसणार आहे.
आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना आपल्याकडच्या या मालिकांचा आशय खूप जुना वाटेल अशी शंकाही आपल्या मनात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आशय किंवा गोष्ट ही कधीच जुनी होत नसते. तिचे काळानुसार संदर्भ बदलत राहतात, हे सांगताना त्यांनी ‘बाहुबली’ चित्रपटाचे उदाहरण दिले. सर्वाधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाची कथा काहीशे वर्षांपूर्वीची आणि काल्पनिक आहे. अशा कथांवरचे कित्येक चित्रपट आपण पाहिले आहेत तरीही ‘बाहुबली’ला सर्वाधिक यश मिळाले. याचे कारण त्याच्या कथेच्या मांडणीत आहे. त्यामुळे आशय कधीच जुना होत नाहीत. या गोष्टीही नव्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर यायला हव्यात, असे मत अनिल क पूर यांनी व्यक्त केले.