१९७५ मधील ब्लॉकबस्टर म्हणून ओळखला जाणारा ‘शोले’ हा हिंदी चित्रपट थ्रीडीच्या रूपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येऊ घातला आहे. मात्र ‘शोले’चा हा नवा अवतार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.  स्वामित्व हक्काच्या मुद्दय़ावरून निर्माता रमेश सिप्पी यांनी नव्या स्वरूपातील ‘शोले’च्या प्रदर्शनाला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या शुक्रवारी याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
पुतण्या साशा याने आपल्याला विश्वासात न घेता ‘शोले’ थ्रीडी स्वरूपात तयार केल्याचा आरोप सिप्पी यांनी केला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यास नकार दिल्यामुळे सिप्पी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. साशा हा रमेश सिप्पी यांचा भाऊ विजय सिप्पी यांचा मुलगा आहे.
साशा यांनी ‘शोले’ हा थ्रीडी स्वरूपात पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांच्या या नव्या रूपातील ‘शोले’कडे डोळे लागले आहेत. रमेश सिप्पी यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच शुक्रवारी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. त्यावर  साशा यांनी  ‘शोले’ चित्रपटाचे हक्क रमेश सिप्पींकडे नाहीत. त्यामुळे रमेश सिप्पी थ्रीडी शोलेच्या प्रदर्शनाला ते विरोध करू शकत नसल्याचा युक्तिवाद केला होता.