गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली असतानाच गणरायाचरणी सिनेकलाकारही नतमस्तक होत आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सध्या गणेशोत्सवात व्यस्त असतानाच दिग्दर्शक राम गोपाल वर्माही बाप्पाचरणी त्याची सेवा अर्पण करतो आहे. गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर अभिनेता रामगोपाल वर्माने बाप्पाकडे माफी मागितली आहे. त्याने ट्विटर अकाऊंटवरुन गणपतीला नमस्कार करतानाचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोसह ‘गणपती तुम्हा सर्वांच्या कुटुंबाला आनंद, आरोग्य आणि सुख देवो, त्यासह माझ्या चुकांनाही माफी मिळू दे’ असे त्याने लिहिले आहे. ‘सर्व जगातील देवांमध्ये गणपतीच श्रेष्ठ देव आहे’, असे लिहित त्याने ‘हे गजानना मी तुझ्यासमोर १००० नारळ फोडेन, १०००० अगरबत्तीही लावेन पण माझ्या ‘आग’ या चित्रपटालाही माफ कर’ अशी विनवणी राम गोपाल वर्माने केली आहे. मला नरकात कमी शिक्षा हवी आहे असेही वर्मा म्हणाला.
यापुढे ट्विट करत ‘मला आता माझ्या चुकांची जाणीव होत आहे, त्यामुळे मला नरकात कमी शिक्षा मिळू दे अशी शिफारस कर’ असे आर्जवी विधानही राम गोपाल वर्मा याने केले आहे. वर्मा याची ही धार्मिक ट्विटरबाजी पाहून अनेकांचा त्यावर विश्वासच बसला नाही.
ट्विटरमुळे चर्चेत येण्याची राम गोपाल वर्मा याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेद्वार डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने ‘फक्त डोनाल्ड ट्रम्पच दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देऊ शकतात जे बराक ओबामा आणि खुद्द जिझस क्राइस्टही नाही करु शकले’ असे लिहिले होते. राम गोपाल वर्माची ही धार्मिक टिवटिव बाप्पा ऐकणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.