एखाद्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी त्यातील व्यक्तिरेखेशी एकरूप व्हायचे हा नवा मार्केटिंग फंडा आहे. आणि रणबीरनेही तो सध्या चांगलाच मनावर घेतला असून ‘बेशरम’ चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी ज्या ज्या गोष्टी बेशरमपणाच्या यादीच मोडतात त्या त्या गोष्टी करायच्या असा चंगच रणबीर आणि त्याचा दिग्दर्शक अभिनव कश्यप या दोघांनीही बांधला आहे. याच हेतूने या जोडगोळीने चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी खास पाटण्यात जायचे ठरवले आहे. जगभर प्रसिध्द असणारे ‘कोमसूत्र’ बिहारमध्ये, तेही पाटण्यात लिहिले गेले अशी माहिती रणबीरला आणि अभिनवला मिळाली. तेव्हा ‘कामसूत्रा’च्या या मूळ शहरात जाऊन ‘बेशरम’चे काही कनेक्शन त्याच्याशी जोडता येते का?, याचा प्रयत्न ते दोघे करणार आहेत.
याआधी ‘बेशरम’चे गाणे एका शानदार सोहळ्यात प्रकाशित करण्यात आले. त्यावेळी चित्रपटातील ‘बेशरम’पणाचे किस्से रणबीरने ऐकवले आणि त्या गाण्यावर भरपूर नाचलाही. मग सगळ्या टीमसोबत रणबीर आणि अभिनवने दुबई गाठले. दुबईत ‘बेशरम’ चित्रपटाची झलक दाखवतानाच रणबीरला अफलातून प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानेही खुल्लमखुल्ला उत्तरे दिली. ‘बेशरम’मध्ये तुला सगळ्यात काय अवघड गोष्ट करावी लागली?, या प्रश्नावर त्याने मला छातीवरचे केस वाढवावे लागले हे उत्तर देताच एकच हशा पिकला. अर्थात, हा एक नव्हे असे अनेक ‘बेशरम’ संवादही या चित्रपटात आहेत.
‘कामसूत्र’ बद्दल भरपूर ऐकीव माहिती असलेल्या या जोडगोळीला वात्स्यायन ऋषीनी बिहारमध्ये कामसूत्र लिहिले होते, ही माहिती नव्याने मिळाली. कामसूत्रचे हे बिहार कनेक्शन ऐकून दोघांचेही डोळे चमकले. लैंगिकता हा आपल्याकडे अजूनही खुल्लमखुल्ला न बोलला जाणारा विषय. त्यामुळे या विषयावरचा ग्रंथ जिथे रचला गेला तिथे जाऊन ‘बेशरम’ चित्रपटाची प्रसिध्दी करण्याचा या दोघांचाही विचार आहे. चित्रपटाचा नायक हा बेशरम आहे हे सिध्द करण्यासाठी प्रसिध्दीचा हा जामानिमा केला जातो आहे. अभिनव कश्यपचा पहिलाच ‘दबंग’ हा चित्रपट यशस्वी झाला होता. त्यामुळे ‘दबंग’ आणि ‘बेशरम’ मध्ये नेमका काय फरक आहे असे वाटते हा प्रश्न विचारल्यावर ‘दबंग’ चा नायक निर्भय होता. ‘बेशरम’चा नायक निर्लज्ज आहे असे उत्तर रणबीरने दिले. त्याच्या या निर्लज्जपणाचा दाखला देण्यासाठी ‘कामसूत्र’ वर काहीबाही बोलून प्रसिध्दी करता येईल, असा एक विचार आहे. आणि त्यासाठी त्या दोघांनाही लवकरात लवकर पाटणा गाठायचे आहे.