आपल्या आयुष्यात एखादी जवळची व्यक्ती कायमची गमावल्याचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच. मात्र अशा क्षणांमध्ये स्वत:ला सावरत खंबीरपणे पुढे जाणं महत्त्वाचं असतं. गुरुवारी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. निर्माते-दिग्दर्शक राकेश रोशन आणि ऋषी कपूर खूप जवळचे मित्र होते. २०१८ मध्येच दोघांना कॅन्सरचं निदान झालं होतं.

डिसेंबर २०१८ मध्ये राकेश रोशन यांना तर ऑगस्ट २०१८ मध्ये ऋषी कपूर यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. राकेश रोशन यांनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली. मात्र ऋषी कपूर यांचा कॅन्सरविरोधी लढा अयशस्वी ठरला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राकेश रोशन बुधवारी रात्रीपासूनच रणधीर कपूर यांना कॉल करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नव्हता. अखेर गुरुवारी सकाळी रणबीर कपूरने स्वत: फोन करून त्यांना वडिलांच्या निधनाची बातमी सांगितली. मित्राच्या निधनाची बातमी ऐकताच राकेश रोशन यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी रणबीरने त्यांना सावरलं. राकेश रोशन म्हणाले, “मी रणबीरचं सांत्वन करण्याऐवजी त्यानेच मला सावरलं. त्याच्या वडिलांसाठी तो मोठा आधारस्तंभ होता.”

राकेश रोशन यांनी नंतर सोशल मीडियावर ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक जुना फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. या फोटोमध्ये रणधीर कपूर, ऋषी कपूर, जितेंद्र आणि राकेश रोशन पाहायला मिळत आहेत. “मी एकटा झालो”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.