भारतात पाकिस्तानी कलाकारांना होणारा विरोध आणि देशात सुरु असणारे असंतोषाचे वातावरण पाहता अभिनेता रणबीर कपूरने याविषयी त्याचे मत मांडले आहे. ‘देशातील तरुण पिढी हिंसेसमोर आपले हात टेकणार नाही. सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहता त्यामुळे आपल्या मनात कोणत्याही प्रकारची कटुता निर्माण होणार नाही’, असे म्हणत ‘मी कोणत्याही प्रकारचा उपदेश देऊ इच्छित नाही. माझे फक्त एवढेच म्हणणे आहे की, आपण सध्या आपण कठीण काळातून जात आहोत’, असे रणबीर म्हणाला.

‘सध्या सुरू असणारे हिंसक वातावरण आणि नकारात्मकता पाहता, आजची युवा पिढी ही नकारात्मकता संपुष्टात आणेल’, अशी आशा रणबीरने व्यक्त केली आहे. पाकिस्तानी कलाकारांबद्दल मनसेच्या विरोधाविषयी आणखी उघडपणे बोलण्यास रणबीरने नकार दिला. तसेच त्याने सर्वांनाच शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. एका कार्यक्रमात रणबीरने त्याचे हे विचार मांडले आहेत. ‘जगातील अनेकांना वाटते की, आपण राहात असलेली जागा फार वाईट आहे. पण, असे नाहीये. ही फारच सुंदर जागा आहे आणि आपण सारेच इथली ताकद आहोत’, असेही रणबीर या कार्यक्रमादरम्यान म्हणाला.

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या गाण्यांमुळे आणि ट्रेलरमुळे सध्या रणबीर प्रचंड चर्चेत आला आहे. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा आणि फवाद खान यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. पण पाकिस्तानी कलाकारांना होणारा विरोध पाहता हा चित्रपटही संकटात दिसत आहे.