मल्टीस्टारर ‘संजू’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणल्यानंतर आता या चित्रपटाचे नवनवीन पोस्टरही राजकुमार हिरानी पोस्ट करु लागले आहेत. अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर भाष्य करणाऱ्या ‘संजू’च्या नव्या पोस्टरमधून अभिनेत्री दिया मिर्झाचा लूक पाहायला मिळतोय. या चित्रपटातून दिया संजूबाबाच्या पत्नीची म्हणजेच मान्यता दत्तची व्यक्तीरेखा साकारत आहे.

अडीअडचणीच्या प्रत्येक प्रसंगात आणि संकटाच्या वेळी मान्यताने संजय दत्तची साथ दिली. अगदी त्याच्या कुटुंबाला जोडून ठेवण्यापासून तो तुरुंगात असतानाही मुलांचा सांभाळ करण्यापर्यंत सर्व वेळप्रसंगी तिथे मोठ्या धीराने उभी राहिली. मान्यताच्या याच वृत्तीमुळे संजूबाबाने तिला आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं आहे. ज्यामुळे ‘संजू’मधूनही मान्यता- संजय दत्तच्या नात्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.

वाचा : हस्तमैथून आणि सेक्सच्या दृश्यांविषयी स्वरा भास्करची आई म्हणतेय…

एक कलाकार म्हणून नावारुपास येणाऱ्या संजय दत्तच्या आयुष्यातील विविध टप्पे या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दाखवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये एक मुलगा, पती, मित्र, प्रियकर, अभिनेता अशा त्याच्या व्यक्तीमत्वाच्या बहुविध छटा पाहता येणार आहेत. २९ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल सध्या कलाविश्वातही अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्याशिवाय रणबीरच्या कारकिर्दीतही हा चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. रणबीर व्यतिरिक्त या चित्रपटातून परेश रावल, मनिषा कोइराला, विकी कौशल, अनुष्का शर्मा, सोनम कपूर हे चेहरेही झळकणार आहेत. तेव्हा आता या मल्टीस्टारर ‘संजू’ला चाहते आपलंसं करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.