Sanju Movie :संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट उद्या (शुक्रवारी) अखेर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे संजय आणि रणबीरच्या चाहत्यांना केवळ एक दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘संजू’ प्रदर्शित होण्यापूर्वीच तो लोकप्रिय झाला असून या चित्रपटाच्या ट्रेलर,टिझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे उद्या बॉक्स ऑफिसवर ‘संजू’ तुफान गाजणार असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. प्रदर्शनापूर्वी नुकतंच ‘संजू’चं स्क्रिनिंग झालं आहे.

संजय दत्तच्या मध्यवर्ती भूमिकेमध्ये दिसणारा रणबीरदेखील या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी उत्सुक असून काल झालेल्या स्क्रिनिंगमध्ये साऱ्या कलाकारांनी रणबीरचं तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.  राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांप्रमाणेच बॉलिवूडमधील मोठ्या हस्तींमध्येदेखील उत्सुकता असल्याचं दिसून आलं. त्यामुळे या स्क्रिनिंगला कलाकारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी स्क्रिनिंगसाठी पोहोचलेल्या  कलाकारांना नुकतंच कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलं आहे.


संजय दत्तच्या भूमिकेमध्ये झळकणारा रणबीर त्याच्या आईबरोबर अर्थात नितू सिंग यांच्याबरोबर या स्क्रिनिंगला पोहोचला. तसेच सोनी राजदान यादेखील स्क्रिनिंगसाठी आल्या होत्या. विशेष म्हणजे रणबीर आणि आलिया यांच्या कथित प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु असूनही आलियाची आई सोनी राजदान आणि नितू सिंग या समोरासमोर आल्यावर काय होणार असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. मात्र प्रत्यक्षात सारे चित्र उलटे दिसून आले. या दोघी अत्यंत मोकळेपणाने वावरतांना दिसून आल्या.

दरम्यान, या स्क्रिनिंगसाठी डेव्हिड धवन त्यांच्या पत्नी आणि मुलाबरोबर या पोहोचल्याचं दिसून आले. तसंच चित्रपटामध्ये संजूच्या आईच्या महत्वपूर्ण भूमिकेमध्ये झळकणारी मनीषा कोइराला ही देखील दिसून आली.

सलग फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर ‘संजू’ हा चित्रपट रणबीरच्या करिअरसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या चित्रपटाच्या यशानं रणबीरच्या करिअरला नक्कीच कलाटणी मिळेल. पण यासाठी त्यानं २०० कोटींचा गल्ला पार करणं महत्त्वाचं आहे असं मत चित्रपट व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांनी व्यक्त केलं आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यात रणबीर सोबतच परेश रावल, सोनम कपूर, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, मनिषा असे अनेक बडे कलाकारही दिसणार आहे.