‘धकधक गर्ल’च्या पहिल्या मराठी चित्रपटात ‘चॉकलेट बॉय’ची हजेरी

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवून नंतर विराम घेणारी ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. माधुरीचा पहिला मराठी चित्रपट म्हणून या चित्रपटाचे कौतुक असतानाच, आता बॉलीवूडचा ‘चॉकलेट बॉय’ रणबीर कपूरही या चित्रपटातून मराठीजनांच्या भेटीला येणार आहे. माधुरीचा चाहता असलेल्या रणबीरने ‘बकेट लिस्ट’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली असून यात तो चक्क मराठीतून बोलतानाही दिसणार आहे.

‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘धर्मा प्रॉडक्शन’ म्हणजेच करण जोहर हे हिंदीतील नाव मराठीशी पहिल्यांदाच जोडले गेले आहे. त्यात आता रणबीर कपूरही कलाकार म्हणून मराठीशी जोडला गेला आहे. ‘बकेट लिस्ट’मध्ये माधुरीने चाळिशीतील गृहिणीची भूमिका केली आहे. चित्रपटाच्या कथेत सई नावाच्या वीस वर्षीय तरुणीची कथा आहे. हृदयदान करणाऱ्या या तरुणीच्या इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार माधुरीच्या व्यक्तिरेखेने केला आहे. याच प्रयत्नात एका मोठय़ा कलाकाराला भेटण्याची तिची इच्छा असते. हा कलाकार नव्या-जुन्या पिढीच्या परिचयाचा असावा आणि त्याच्याशी सगळेच सहजतेने जोडले जातील, अशा कलाकाराच्या शोधात आम्ही होतो. त्या वेळी रणबीर कपूरच्या नावाचा पहिला विचार केला. ही कल्पना माधुरीला सांगितल्यानंतर तिने तात्काळ रणबीरशी संपर्क साधला. त्यानेही कुठलेही आढेवेढे न घेता चित्रपटात छोटीशी भूमिका करण्यास होकार दिला, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस देऊस्कर यांनी दिली.

पहिल्याच भेटीत रणबीरने चित्रपटाची कथा ऐकली, त्याला ती खूप आवडली. मराठी आपल्याला तितके समजत नाही, बोलताही येत नाही; पण मराठी चित्रपट जे पाहिले ते खूप चांगले आहेत. त्यामुळे ‘बकेट लिस्ट’च्या निमित्ताने मराठी चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल, असे सांगणाऱ्या रणबीरने मनापासून वेळ देत हा छोटासा प्रसंग चित्रपटात साकारल्याचे देऊस्कर म्हणाले. या चित्रपटात खरे म्हणजे तो रणबीर कपूर म्हणूनच लोकांसमोर येणार आहे, त्यामुळे त्याने मराठीत संवाद म्हणण्याची गरज नव्हती; पण त्याने स्वत:च आपल्या या भूमिकेत मराठी वाक्ये असावीत असा आग्रह धरला. त्यामुळे या चित्रपटात तो थोडे का होईना मराठीत बोलला आहे, असेही त्यांनी सांगितले.

रणबीरने माझ्या चित्रपटात छोटीशी भूमिका करावी ही कल्पनाच मला आवडली होती. आम्ही जेव्हा ‘घागरा’ (ये जवानी है दिवानी) केले तेव्हा खूप मजा केली होती आणि आमच्या दोघांमधली तीच केमिस्ट्री या सीनसाठीही काम करून जाईल, याची खात्री होती. त्याचा सेटवरचा वावरही कलाकार-तंत्रज्ञांवर जादू करून गेला.

– माधुरी दीक्षित