बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या ‘सुलतान’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता रणदीप हुडा अचानक बेशुध्द झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. चित्रीकरणादरम्यान रणदीपचे अॅपेंडिक्सचे दुखणे बळावल्याने तो बेशुध्द झाला. चित्रपटात तो सलमानच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. तर सलमान कुस्तिपटूच्या भूमिकेत दिसेल. चित्रीकरणादरम्यान रणदीपच्या अचानक पोटात दुखू लागले आणि तो बेशुध्द झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या व्याधीने त्रस्त असलेला रणदीप व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत होता. चित्रीकरणाच्या स्थळी झालेल्या या घटनेनंतर रणदीपला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. मंगळवारी त्याला रुग्णालयातून घरी पाठविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी संगितले. ‘सुलतान’ व्यतिरिक्त रणदीप ‘सरबजीत’ आणि ‘लाल रंग’ चित्रपटांचे चित्रीकरण देखील करत आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे येणाऱ्या काही दिवसांसाठी तो आपल्या तीनही चित्रपटांचे चित्रीकरण थांबविणार असल्याचे त्याच्या प्रवक्त्याने सांगितले.