काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांचे वडील, जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना करोना झाला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रणधीर कपूर यांनी करोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रणधीर कपूर यांनी ई-टाइम्सशी संवाद साधला. ‘मी आता घरी आलो आहे. मला बरे वाटत आहे’ असे त्यांनी म्हटले आहे. पुढचे काही दिवस रणधीर कपूर पत्नी बबीता, मुली करिश्मा कपूर आणि करीना कपूर खान, जावई सैफ अली खान यांना भेटणार नाहीत. ‘मला पुढचे काही दिवस सर्वांपासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आणखी काही दिवस नंतर मी पुन्हा सगळ्यांना भेटेन’ असे रणधीर म्हणाले.

आणखी वाचा : ‘वाजिदच्या निधनानंतर माझ्या कामाच्या क्षमतेवर अनेकांनी शंका घेतली’, साजिदने व्यक्त केली खंत

पुढे ते सर्वांचे आभार मानत म्हणाले, ‘हॉस्पिटलमध्ये माझी काळजी घेतलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांनी माझी योग्य ती काळजी घेतली.’

२९ एप्रिल रोजी ७४ वर्षीय रणधीर कपूर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता रणधीर कपूर यांनी करोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.