अभिनेता ओंकार गोवर्धनकडून पुस्तकाचा मराठी अनुवाद

नाटक करणाऱ्या प्रत्येकाला स्तानिस्लावस्की माहीत असतो. त्यांनी सांगितलेली अभिनयाची तंत्रे कधी ना कधी वापरली जातात, मात्र अभिनयाच्या पलीकडे जाऊन आपल्या नाटय़विषयक धारणा स्पष्ट करण्याची संधी रंगकर्मीना मिळणार आहे. अभिनेता ओंकार गोवर्धनने स्तानिस्लावस्कीच्या ‘आर्ट ऑफ द स्टेज’ या पुस्तकाचा ‘रंगमंचकला’ हा मराठी अनुवाद केला असून, तो राजहंस प्रकाशनातर्फे पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आहे.

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

कोनस्टन्टिन स्तानिस्लावस्की हा रशियन रंगकर्मी होता. त्यांनी नाटक या प्रकाराला दिशा दिली. भूमिकेचा शोध घेण्यापासून, तालमी, नाटकाचं सादरीकरण अशा अनेक अंगांचा सखोल अभ्यास करून नवीन तंत्रे मांडली. आधुनिक नाटकात ही तंत्रे महत्त्वाची मानली जातात. के. नारायण काळे यांनी स्तानिस्लावस्कीच्या दोन पुस्तकांचा मराठी अनुवाद या पूर्वी केला आहे. मात्र, ‘द आर्ट ऑफ द स्टेज’ हे महत्त्वाचं पुस्तक प्रथमच वाचकांपुढे येत आहे. १९५ पृष्ठांच्या या पुस्तकात रंगमंचीय नीतिनियम विशद करण्यात आले आहेत. एकूण तीन व्याख्यानांचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय स्तानिस्लानस्की यांच्याविषयीची माहिती, त्यांचं योगदान यांविषयी एक स्वतंत्र प्रकरण ओंकारनं लिहिलं आहे. नव्या पिढीचा रंगकर्मी असलेल्या ओंकारचं हे पहिलंच पुस्तक आहे. ओंकारच्या या पुस्तकामुळे नाटय़विषयक मराठी पुस्तकांमध्ये महत्त्वाची भर पडली आहे.

या पुस्तकाविषयी ओंकारनं ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. ‘इंग्रजीतून हे पुस्तक वाचल्यावर मला ते महत्त्वाचं वाटलं. हे पुस्तक मराठीत आलं, तर जास्तीतजास्त वाचकांपर्यंत, रंगकर्मीपर्यंत पोहोचू शकेल, या विचारातून त्याचा अनुवाद करायचं ठरवलं. या अनुवादासाठी मला बराच कालावधी लागला. तीन वेळा पुस्तकाचं पुनर्लेखन झालं. स्तानिस्लावस्की यांनी सांगितलेल्या पद्धती, तंत्र महत्त्वाची आहेत, मात्र गेल्या काही काळात नाटक हे माध्यम म्हणून बरंच पुढे गेलं आहे, विकसित झालं आहे. हे पुस्तक केवळ तंत्राविषयी नाही, तर नाटय़ धारणांविषयी आहे. कलाकारांनी मानसिक तयारी कशी करावी इतक्या प्राथमिक पातळीपासूनची माहिती या पुस्तकात आहे,’ असं ओंकार म्हणाला.

‘पुस्तकाचा अनुवाद करताना मला नाटक करतानाच्या अनेक गोष्टी आठवत होत्या. या पुस्तकामुळे माझ्या नाटय़विषयक धारणा स्पष्ट झाल्या. हे पुस्तक केवळ नाटकाविषयीच नाही, तर एकंदर आयुष्याविषयीही मौलिक मार्गदर्शन करतं. त्यामुळे नाटक करणाऱ्या रंगकर्मीसह सर्वसाधारण वाचकांनाही हे पुस्तक नक्कीच आवडेल,’ असंही त्यानं सांगितलं.