येत्या २४ तारखेला प्रदर्शित होत असलेल्या विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ सिनेमात कंगना राणावत प्रमुख भूमिकेत आहे. तिला मिळालेला हा पहिलाच बिग बजेट, बिग बॅनर सिनेमा. त्यानिमित्त तिच्याशी बातचीत-

‘रंगून’मध्ये तू चाळीसच्या दशकातल्या अ‍ॅक्शन स्टारची भूमिका केली आहेस. तिची तयारी तू कशी केलीस?
– ‘रंगून’मध्ये मी जी ज्यूलियाची भूमिका केली आहे. ती तिच्या बहारदार नृत्यासाठी, अ‍ॅक्शन्ससाठी प्रसिद्ध होतीच. शिवाय तिला चाबूकवाली म्हणूनही ओळखलं जायचं. अभिनयाच्या पातळीवर मात्र ती अतिशय सुमार होती. त्यामुळे सिनेमात विनोदनिर्मितीच्या जागा तयार झाल्या आहेत. तिच्यामध्ये एक प्रकारची असुरक्षितता असते. त्यामुळे ती बिलीमोरिया रुसी नावाच्या माणसामध्ये आधार शोधते. ही भूमिका सैफ अली खानने केली आहे. तो तिच्यामधल्या या असुरक्षिततेचा फायदा घेत असतो. मी त्या काळात नाकातून बोलणाऱ्या स्त्रियांचाही बराच अभ्यास केला. कारण त्याआधीच्या काळात मूकपट निघायचे. त्यामुळे सिनेमाच्या पडद्यावर आवाज ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप नवीन होती. आज आम्ही सिनेमात जसे डायलॉग म्हणतो, तसं त्या काळातल्या स्त्रिया अजिबात म्हणायच्या नाहीत. त्यामुळे मी त्यांच्या पद्धतीने डायलॉग म्हटले आहेत. काहीसे नाकातून आणि काहीसे सिंग अ साँग पद्धतीने. प्रेक्षक त्या काळाशी एकरूप व्हावेत यासाठी मी बरीच मेहनत घेतली आहे.

‘रंगून’ शारीरिक दमणूक करणारा होता का?
– अभिनेते म्हणून आम्ही त्या व्यक्तिरेखेचे अनेक पैलू पाहात असतो. ‘क्वीन’सारख्या सिनेमाच्या व्यक्तिरेखेची भावनिक, बौद्धिक गरज होती. ज्युलिया अ‍ॅक्शन स्टार असल्यामुळे या व्यक्तिरेखेसाठी शारीरिक तयारी करण्याची गरज होती. तिचा तो स्टॅमिना मिळवण्यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागले. पण मी ते घेतले आणि तो स्टॅमिना गाठला.

गेली काही वर्षे तू बॉक्स ऑफिसवर हिट सिनेमे देते आहेस. करिअरच्या अशा स्टेजला तुझ्यासाठी ‘रंगून’चं नेमकं महत्त्व काय आहे?
-‘रंगून’ माझ्यासाठी अर्थातच खूप महत्त्वाचा आहे. याचं एक कारण म्हणजे एक तर मी अशा पद्धतीच्या इतक्या मोठय़ा सेटअपमध्ये कधीच काम केलेलं नाही. मला इतका मोठा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल मी ‘रंगून’चे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांची कायमच ऋणी आहे. आत्तापर्यंतचे माझे सगळेच सिनेमे हे लहान लहान प्रोजेक्ट होते आणि त्यांच्याबद्दल ही अशी चर्चा कधीच नव्हती. इतक्या मोठय़ा बजेटचा सिनेमा मिळणं हे कुणाही अभिनेत्याचं स्वप्नच असतं. काही अभिजात प्रेमकथा काळाच्या कसोटीवर टिकून राहतात. ‘रंगून’ त्यापैकी एक आहे.

विशाल भारद्वाज यांच्या सिनेमातल्या स्त्री व्यक्तिरेखा नेहमीच अतिशय ठसठशीत आणि महत्त्वाच्या असतात. त्यांच्याबरोबर काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
– मुख्य म्हणजे त्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट नसतात, तर त्यांना ग्रे शेड्स असतात. विशाल भारद्वाजना त्या व्यक्तिरेखेचं वास्तव मांडायचं असतंच, त्याबरोबर त्यांना त्या व्यक्तिरेखेची मानसिकताही पडद्यावर मांडण्यात रस असतो. त्यांनी आजवर स्त्रीच्या मनातलं व्दंद्व पडद्यावर नीट मांडलं आहे. ज्या कलाकाराला वैशिष्टय़पूर्ण, उठावदार व्यक्तिरेखा करायच्या आहेत, त्याच्यासाठी त्यांच्यासारखा दिग्दर्शक मिळणं ही देवाची देणगीच आहे. ‘ओमकारा’मध्ये सैफ अली खान, ‘हैदर’मध्ये शाहीद कपूर यांना स्वत:चा नव्याने शोध लागला तो विशाल भारद्वाज यांच्यामुळेच. ‘रंगून’मध्ये त्यांनी मलाही ज्या पद्धतीने पडद्यावर दाखवलं आहे, तसं तुम्ही आजवर मला कुठल्याच सिनेमात पाहिलं नसेल. ट्रायल्समध्ये खोटं नाक किंवा खोटे दात लावणं याची मला आता सवय झाली आहे. त्यामुळे असं वेगळं दिसण्याबद्दल माझी काही तक्रारही नसायची. पण ते मात्र हेअर स्टाइल, ओठांचा रंग अशा प्रत्येक बारीकसारीक गोष्टीबद्दल इतके दक्ष असायचे. आणि हे अगदी प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल असायचं. म्हणजे सैफच्या व्यक्तिरेखेच्या मिशीची रुंदी किती असायला हवी याबद्दलही ते प्रत्येक वेळी काटेकोर असायचे. त्यांचं हे प्रत्येक वेळी इतकं तपशिलात जाणं मला खरंच अचंबित करणारं होतं.

‘रंगून’साठी तू तुझ्याबरोबरच्या दोन पुरुष कलाकारांइतकेच पैसे मिळावेत अशी मागणी केलीस अशी चर्चा होती..
– मला माझ्या क्षमतेप्रमाणे पैसे मिळायला हवेत, असं माझं म्हणणं आहे.

आता आपल्याकडे व्यावसायिक पातळीवर स्त्री केंद्रित सिनेमे बनायला लागले आहेत, असं तुला वाटतं का?
– होय आणि अशा सिनेमांना व्यावसायिक यशही मिळायला लागलेलं आहे. २०१४ नंतर जगात सगळीकडेच स्त्रीवादाची लाट आहे. आमिर खानने काढलेला ‘दंगल’ हा सिनेमा तर ‘क्वीन’पेक्षाही जास्त स्त्रीवादी आहे. त्यामुळे बुद्धिमान लोक या लाटेवर आरूढ होतील. अजूनही जे पुरुषप्रधान आणि सरंजामी संस्कृती कवटाळून बसले आहेत ते मागे पडतील. अर्थात आपण हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की पुरुषप्रधान समाजात ही स्त्रीवादाची लाटदेखील व्यावसायिक पातळीवर बहुसंख्य असलेल्या पुरुषांनाच आणावी लागते.

तू एकटीच बराच प्रवास करतेस..
– नेहमीच. अलीकडेच मी जर्मनीत होते. तुम्ही जेव्हा अभिनेते म्हणून काम करत असता तेव्हा तुमच्यावर वेगवेगळी ओझी असतात, कधी तुमची स्वत:ची, कधी त्या त्या व्यक्तिरेखेची, शिवाय तुमच्यावर सतत लोकांचं, माध्यमांचं लक्ष असतं. अर्थात त्याशिवाय मी व्यक्तिगत पातळीवर लोकांचा द्बवेष, विश्वासघात असं बरंच काही सोसलं होतं. त्याचा तुमच्यावर परिणाम होत असतो. तुम्ही एकटे असता तेव्हा त्या सगळ्याशी तुम्ही दोन हात करायचा प्रयत्न करता. तुम्हाला नेमकं काय सलतं आहे ते समजून घेता. काय स्वत:जवळ ठेवायचं आणि काय मागे टाकायचं ते तुमचं तुम्हाला उमजतं. मी बरंच मेडिटेशन करते, हायकिंग करते, खेळते. त्यामुळे मला या सगळ्यातून बाहेर पडायला मदत होते. लोक आणि माझ्याभोवतीच्या एनर्जी याबाबत मी खूप संवेदनशील आहे. लोक अवतीभोवती असतात तेव्हा एका विशिष्ट पद्धतीने वागायची मला सवय आहे. असं असतं तेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या, मूळ मानसिकतेशी जुळवून, जमवून घेऊ  शकत नाही. खरं तर तुमचा तुमच्याशी स्वत:शी संवाद असायला हवा. मला स्वत:शी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. तसं करताना मला माझ्या पालकांनी पाहिलं आणि त्याबद्दल मला दोषी ठरवलं. खरं तर मला असं बोलणं कधीच अनैसर्गिक वाटत नाही. उलट प्रत्येकाने ते करावं असं माझं मत आहे. स्वत:शी बोलणं ही एक प्रकारची थेरपीच आहे.

या काळात तू सिनेमे बघणं, पुस्तकं वाचणं हे करतेस का?
– मी सिनेमे बघत नाही, पण मी भरपूर वाचते. मला माझ्या आयुष्यात पुस्तकांकडून खूप काही मिळालं आहे. पण मी शूटिंग सुरू असताना मध्येच पुस्तक उघडून वाचत बसू शकत नाही. आयुष्याचा जोडीदार निवडावा एवढय़ा काळजीपूर्वक मी माझी पुस्तकंही निवडते. मला एक पुस्तक वाचायचं होत. मग मी नोव्हेंबपर्यंत थांबले. माझ्या मनातला सगळा कचरा बाहेर पडू दिला आणि मगच ते वाचायला घेतलं. अशी माझी वाचायची पद्धत आहे. मी माझ्या कामाबद्दल मोकळेपणाने बोलते. पण मी कोणतं पुस्तक वाचते ते मात्र मी सहजपणे सांगत नाही कारण मी मगाशी म्हटलं तसं माझ्या जोडीदाराबरोबर माझं जसं नातं असेल तसंच माझं माझ्या पुस्तकांबरोबर नातं असतं.

गेल्या वर्षी तुझ्याबाबत जे झालं त्या सगळ्यातून तू आता बाहेर आली आहेस का?
– खरंतर माझ्यासाठी ते अवघड होतं. पण माझ्यावर असे प्रसंग नेहमीच आले आहेत. माझ्या वडिलांनी माझा अपमान केला, माझा स्वाभिमान दुखावला तेव्हा मी त्यांच्या घरातून बाहेर पडले. माझ्या मित्रांनी माझा अपमान केला तेव्हा मी त्यांच्यापासून बाजूला झाले. जेव्हा कुणी माझा सार्वजनिक पातळीवर अपमान करतं, तेव्हा त्याला माझ्या हृदयात कितीही महत्त्वाचं स्थान असो, मी त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मला कितीतरी जणी माहिती आहेत, ज्या असा अनुभव येऊनही असं काहीही करत नाहीत. गप्प बसतात. स्त्रिया आत्महत्या करतात तेव्हा मला खरंच आश्चर्य वाटतं की त्यांना ज्यापासून वेदना होतात, त्या गोष्टीपासून त्या दूर का जात नाहीत? त्याऐवजी स्वत:चा जीव का देतात? त्या नकारात्मकतेला नकार का देत नाहीत. एकाच वेळी दोन बुटांमध्ये पाय ठेवणं हे अशक्य आहे. तुम्ही दुसऱ्याला दुखवू शकत नाही, तुम्ही तुमच्या प्रियकराला नाही म्हणू शकत नाही, तुम्ही तुमच्या आईला तुम्हाला काय आवडत नाही ते सांगू शकत नाही.. हे सगळं असा विचार करणं बदलायला हवं. आपण प्रेयसी म्हणून, बहीण म्हणून, आई म्हणून उत्तमच आहोत हे तुम्हाला लोकांना सांगता यायला हवं. तुमच्या अस्तित्वाचाच प्रश्न असतो तेव्हा तुम्हाला हा संघर्ष करता यायलाच हवा. त्यामुळे माझ्यापुरतं सांगायचं तर या अनुभवातून मी अधिक कणखर झाले आहे.

तुला स्वत:ला स्त्रियांच्या प्रश्नांशी जोडून घ्यायला आवडेल का?
– अनेक कणखर, बुद्धिमान स्त्रियांनी मला घडवलं आहे. त्यांच्याप्रमाणे मलाही समाजाला काहीतरी द्यायला आवडेल.

तू स्वत:चं वर्णन या शतकातली संघर्ष करणारी स्त्री असं करतेस..
– मी लहानपणापासून संघर्ष करत आले आहे. मी इतका संघर्ष केला आहे की आता मला त्याचा कंटाळा आला आहे. माझा संघर्ष मी कोण आहे, मी नेमकी काय आहे हे समजूनच न घेणाऱ्या लोकांशी आहे. सगळ्यात आधी माझा संघर्ष झाला तो माझ्या पालकांशी. मी सर्वसामान्य, रुळलेल्या वाटेवरून चालावं अशी त्यांची इच्छा होती आणि ती माझ्यावर लादायचा ते प्रयत्न करत होते. तर माझ्या भावासाठी मात्र त्यांनी जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी राखून ठेवल्या होत्या. मला पूर्णपणे अनोळखी असलेल्या माणसाशी त्यांना माझं लग्न लावून द्यायचं होतं. तेही एका शब्दानेही माझं मत विचारात न घेता. मी या इंडस्ट्रीत आले तेव्हा लोकांनी मला एका विशिष्ट वर्गात ढकलायचा प्रयत्न केला. माझ्या वैयक्तिक आयुष्यात प्रेमप्रकरण होतं, ती माझी खासगी गोष्ट होती, पण ते सार्वजनिक केलं गेलं. मला ते अजिबात आवडलं नाही. माझ्यामध्ये माझ्या म्हणून बऱ्याच क्षमता आहेत. आज मी स्वतंत्रपणे जगते आहे. मी या इंडस्ट्रीमधली एक महत्त्वाची अभिनेत्री आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं.

तुला इतरही बऱ्याच गोष्टी करता आल्या असत्या. मग तू अभिनय हेच क्षेत्र का निवडलंस?
– मी अभिनय हे क्षेत्र नाही निवडलं, तर त्या क्षेत्रानेच माझी निवड केली आहे. पण मी असं अजिबात म्हणणार नाही की आता मी मला पोहोचायचं होतं त्या मुक्कामाला पोहोचले आहे. मला आयुष्यात आणखी बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. मला माझ्या आयुष्यात माझा विकास व्हायला हवा आहे. मला माझं आयुष्य वेगवेगळ्या धाडसांनी भरलेलं असायला हवं आहे. मला दिग्दर्शन करायचं आहे, मला भरपूर प्रवास करायचा आहे, मला फॅशन लेबल लाँच करायचं आहे. मला माझं कुटुंब हवं आहे, मला डोंगरांमध्ये फिरायचं आहे. मी आतापर्यंतच्या आयुष्याकडे मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की मी जे जे केलं ते उत्तमच केलं.

(‘द संडे एक्स्प्रेस’मधून साभार)

अनुवाद- वैशाली चिटणीस
response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा