निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शो मध्ये नुकतीच हजेरी लावली होती ती म्हणजे अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता सैफ अली खान यांनी. हे दोन्ही कलाकार त्यांच्या आगामी रंगून या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आणि करणसोबत धमाल गप्पा मारण्यासाठी सैफ आणि कंगनाने मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. बॉलिवूडची क्वीन आणि नवाब असा सुरेख मेळ साधत कॉफी विथ करणचा राजेशाही थाट असलेला हा भाग पार पडला. करण जोहर नेहमीच त्याच्या सेलिब्रिटी मित्रांना वेगळ्याच अंदाजात इतरांसमोर आणतो तसेच त्याने सैफ आणि कंगनाच्या बाबतीतही केले.

गप्पांच्या ओघात करण जोहर आणि कंगनाने काही आठवणींनाही उजाळा दिला. कंगनाकडून करणने ती कारकीर्दीत काही मोठा पल्ला गाठू शकेल अशी कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती असेही त्याने स्पष्ट केले. त्यावेळी कंगनाने तिच्या इंग्रजी बोलण्याची काही निर्मात्यांनी खिल्ली उडविली होती असेही म्हणत अनेकांचे लक्ष वेधले. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वबळावर ओळख निर्माण करणाऱ्या काही कलाकारांच्या यादीत कंगना रणौतच्या नावाचाही समावेश होतो. पण, सुरुवातीच्या काळात तिच्यावरही टीका करण्यात आल्या होत्या. आदित्य चोप्रा आणि करण जोहर यांचेही कंगनाबद्दल फारसे चांगले मत नव्हते असेही तिच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. दरम्यान, कंगनासोबतच सैफनेही काही प्रश्नांना स्पष्टपणे उत्तरं देत या चर्चात्मक गप्पांची रंगत वाढवली. तैमुर विषयीच्या प्रश्नांनाही सैफने उत्तरं दिली. दरम्यान, तैमुरच्या नावावरुन ज्या काही चर्चा रंगल्या होत्या तो सर्व प्रकार धक्कादायक होता असे मत कंगनाने मांडले.

प्रश्नोत्तरं आणि गप्पा असा मेळ साधत करणच्या प्रश्नांना कंगनाने अगदी तिच्या शैलीत निभावून नेले असे म्हणावे लागेल. कंगना आणि सैफ हे दोन्ही कलाकार सोशल मीडियापासून दूर राहण्यास प्राधान्य देतात. करणने यासंदर्भात चर्चा करत ज्यावेळी करणने दोन्ही कलाकारांना प्रश्न विचारला तेव्हा सैफने तो क्षण आणि त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यायला आवडत असून ते रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर पोस्ट करणे आपल्याला आवडत नसल्याचे स्पष्ट केले. करण, सैफ आणि कंगनाच्या या गप्पांची झलक असलेले काही व्हिडिओ स्टार वर्ल्डच्या ट्विटर अकाऊंटवरही पोस्ट करण्यात आले आहेत.

कंगना रणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर अशी तगडी स्टारकास्ट घेऊन दिग्दर्शक विशाल भारद्वाज ‘रंगून’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या चित्रपटवर्तुळात या चित्रपटासंबंधीच्या चर्चा रंगत असून चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने गुलजार यांनी शब्दबद्ध केलेली काही गीतेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.