कंगना रनौत आणि शाहिद कपूर आगामी ‘रंगून’ चित्रपटामुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या अनेक चर्चांमध्ये आता आणखी एक उपलब्धी मिळाली आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटातील एका गाण्याला अॅनिमेशन इफेक्ट देण्यात आले आहेत. वंडरलॅण्ड सिरियल टायटलच्या रुपात कंगना -शाहिद यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याला अॅनिमेटेड करण्यात आले आहे. भारद्वाज यांचे संगीत आणि गुलजार यांचे बोल असणारे अनोख्या अंदाजातील या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळताना दिसत आहे.’टप टप टोपी टोपी’ हे वेगळ्या अंदाजातील गाणे बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारे असे आहे.’रंगून’ चित्रपटातील ‘टप टप टोपी टोपी’ या मुळ गाण्यात गोंधळलेली कंगना आणि आपल्याच धुंदीत गुंग असणारा शाहिद कपूर दिसला आहे. हे गाणे रेल्वेमध्ये चित्रीत करण्यात आले आहे. अनिमेटेड करण्यात आलेले हे गाणे बच्चे कंपनीसाठी तर पर्वणी ठरेलच, पण प्रौढांना देखील आपल्या बालपणात घेऊन जाईल, असे हे गाणे आहे.

यापूर्वी रंगून चित्रपटातील ‘मेरे मिया गये इंग्लंड’ या गाण्याला चांगली लोकप्रियता मिळाली होती. गाण्याची चाल आणि एकंदर नृत्य पाहिले तकर याआधी प्रदर्शित झालेल्या ‘ब्लडी हेल’ या गाण्याच्या तुलनेत हे गाणे तितके प्रभावी नव्हते. पण, ज्या पद्धतीने गाणे शब्दबद्ध करण्यात आले आहे ते अनेकांचेच लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले. या गाण्यामध्ये कंगनासह शाहिद कपूर आणि सैफ अली खानसुद्धा या दिसले आहेत. या गाण्यात कंगना जुन्या काळातील चित्रपट अभिनेत्रीप्रमाणे दिसत आहे. तिचा हा लूक आणि एकंदर वेशभूषा पाहताना १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिस देश मे गंगा बहती है’ किंवा १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मधुमती’ या चित्रपटातील पद्मीनी आणि वैजयंतीमाला या अभिनेत्रींची आठवण करुन देणारा असल्याची चर्चा रंगली होती.

या चित्रपटामध्ये कंगना १९४० दरम्यानच्या एका चित्रपट नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शाहिद या चित्रपटामध्ये जमादार नवाब मलिक या भूमिकेत झळकणार आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटाचे कथानक दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणींना उजाळा देणारे आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि पोस्टरमध्ये युद्धजन्य परिस्थितीचे दर्शन होत आहे. प्रेमाचा त्रिकोण दाखविणाऱ्या या चित्रपटात लव्ह (प्रेम), वॉर (युद्ध) आणि डिसिट (धोका) या त्रिकोणाभोवती फिरणारे कथानक पाहायला मिळू शकते. धैर्य, गॅम्बल आणि रोमान्सची सांगड घालणारा हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.