मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हिचकी’ चित्रपट काही दिवसांपूर्वी चीनमध्येही प्रदर्शित झाला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यावर हा चित्रपट आधारला आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट चिनी प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे. म्हणूनच राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’नं भारतापेक्षा चीनमध्ये जास्त कमाई केली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बघता बघता बघता या चित्रपटानं १०० कोटींहून अधिकचा टप्पादेखील पार केला. आतापर्यंत चीनच्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं १०३ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत आहे. नैना माथुरला टुरेट सिन्ड्रम हा आजार असतो. या आजारामुळे तिच्या तोंडून सतत निघणाऱ्या आवाजांवर तिचे नियंत्रण नाही. आपल्या आजारामुळे खचून न जाता उलट त्यालाच शस्त्र करत नैना आपले शिक्षण पूर्ण करते. तिला शिक्षक म्हणून काम करायचं आहे आणि तिच्या आजारामुळे तिला सतत काम नाकारले जाते. अखेर नैनाला ती ज्या शाळेत शिकली होती त्याच शाळेत नोकरीची संधी मिळते. मात्र तिच्या हातात जो वर्ग येतो तो ‘नववी फ’ नावाच्या तुकडीखाली असलेल्या १४ टवाळ मुलांचा.. शिक्षण हक्क कायद्यामुळे महापालिका शाळेत शिकणारी ही १४ मुले या प्रतिष्ठित इंग्रजी शाळेत दाखल होतात. मात्र दोन वर्गामधील असलेली दरी या मुलांना कायम शाळेपासून आणि शाळेतील इतर मुलांपासून दूर ठेवते. या मुलांना योग्य दिशा दाखवण्यासाठीचा शिक्षकानं केलेली खटपट या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.

भारतात या चित्रपटानं ७६ कोटींची कमाई केली होती. मात्र भारताच्या तुलनेत चीनमधली कमाई ही अधिक आहे. ‘चांगल्या चित्रपटाला भाषेचं बंधन नसतं. जगभरातील प्रेक्षकांना हिचकीची कथा आवडत आहे, ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे’ असं म्हणत राणीनं आपला आनंद व्यक्त केला आहे. चीन व्यतिरिक्त रशियन भाषेत हा चित्रपट डब करण्यात आला असून गेल्या महिन्यात तो रशियात प्रदर्शित होणार आहे.