16 February 2019

News Flash

राणीचा ‘हिचकी’ कझाकस्तानातही होणार प्रदर्शित

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्यामधील गोष्ट सांगणारा हिचकी पुढील महिन्यात रशियातही प्रदर्शित होत आहे.

हिचकी

मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा चित्रपट रशियानंतर आता कझाकस्तानमध्येही प्रदर्शित होणार आहे. स्वत:च्या अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांसाठी धडपडणाऱ्या शिक्षिकेची गोष्ट ‘हिचकी’ मधून दाखवण्यात आली आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्यामधील गोष्ट सांगणारा हिचकी पुढील महिन्यात रशियात प्रदर्शित होत आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात हा चित्रपट कझाकस्तानमध्येही प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात राणी मुखर्जीनं नैना माथुर या शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. नैना माथुरला टुरेट सिन्ड्रम हा आजार असतो. या आजारामुळे तिच्या तोंडून सतत निघणाऱ्या आवाजांवर तिचे नियंत्रण नाही. आपल्या आजारामुळे खचून न जाता उलट त्यालाच शस्त्र करत नैना आपले शिक्षण पूर्ण करते. तिला शिक्षक म्हणून काम करायचं आहे आणि तिच्या आजारामुळे तिला सतत काम नाकारले जाते. अखेर नैनाला ती ज्या शाळेत शिकली होती त्याच शाळेत नोकरीची संधी मिळते. मात्र तिच्या हातात जो वर्ग येतो तो ‘नववी फ’ नावाच्या तुकडीखाली असलेल्या १४ टवाळ मुलांचा.. शिक्षण हक्क कायद्यामुळे महापालिका शाळेत शिकणारी ही १४ मुले या प्रतिष्ठित इंग्रजी शाळेत दाखल होतात. मात्र दोन वर्गामधील असलेली दरी या मुलांना कायम शाळेपासून आणि शाळेतील इतर मुलांपासून दूर ठेवते. या मुलांना योग्य दिशा दाखवण्यासाठीचा शिक्षकानं केलेली खटपट या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.

‘शंघाय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाचं भरभरून कौतुक करण्यात आलं. ६ सप्टेंबरला हा चित्रपट रशियात प्रदर्शित होणार आहे. हा दिवस तिथे ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे यापेक्षा चांगलं औचित्य या सिनेमासाठी असू शकत नाही. रशियानंतर २० सप्टेंबरला हिचकी कझाकस्तानमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ७६ कोटींची कमाई केली होती. सिद्धार्थ मल्होत्रानं या चित्रपटानं दिग्दर्शन केलं आहे. रशिया आणि कझाकस्तानमधून या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on August 21, 2018 2:47 pm

Web Title: rani mukerji hichki is all set to release in kazakhstan