एका सत्यघटनेवर आधारित ‘मर्दानी-२’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत असून ती इन्स्पेक्टर शिवानी शिवाजी राव ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटामधून एका रेपिस्टला पकडण्यासाठीची तिची धडपड पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी राणी प्रचंड मेहनत करत आहे. चित्रपटामध्ये निडर आणि प्रचंड आत्मविश्वासू दिसणाऱ्या राणीने तिच्या खऱ्या आयुष्यातही एका भीतीवर मात केल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्तानेच तिची भीती दूर झाल्याचं तिने सांगितलं.

‘मर्दानी-२’मध्ये राणी एका इन्स्पेक्टरची भूमिका साकारत असल्यामुळे तिच्यात दरारा, निडरता, साहस हे गुण असणं आवश्यक होतं. त्यासाठी भूमिकेला न्याय देण्यासाठी राणी प्रचंड मेहनत करत आहे. या चित्रपटातील एका दृश्यामध्ये राणीला पाण्याखाली काही अॅक्शन सीन करायचे होते. मात्र राणीला पोहता येत नसल्यामुळे तिला पाण्याची प्रचंड भीती वाटते. मात्र भूमिकेला न्याय देण्यासाठी राणीने तिच्या या भीतीवर मात केली.

“मला पाण्यात पोहता येत नाही, त्यामुळे मला लहानपणापासून पाण्याची प्रचंड भीती वाटते. मी दिग्दर्शकांना माझ्या या समस्येविषयी सांगितलंदेखील मात्र ते काही केल्या हा सीन वगळायला तयार नव्हते. खरं तर आमचं जूनमध्येच चित्रीकरण पूर्ण झालं होतं. केवळ पाण्याखालील अॅक्शन सीन शूट करण्याचा राहिला होता. त्यातच चित्रपटाची रिलीज डेटदेखील जवळ येत होती, त्यामुळे मला हा सीन करणं आवश्यकच होतं. मात्र मनात भीती कायम होती. परंतु अनीस एडेनवाला यांच्या रुपात मला एक उत्तम प्रशिक्षक मिळाले. त्यांच्यामुळेच मला हा सीन करणं शक्य झालं, असं राणीने सांगितलं.

वाचा : ‘आरे’मध्ये येताना पाच झाडं तरी घेऊन या – सयाजी शिंदे

पुढे ती म्हणते, “अनीस यांनी मला पाण्यात हा सीन शूट करण्यास प्रचंड मदत केली. तसंच माझ्या मनात आत्मविश्वासही जागवला. जर आज माझ्या मनातून पाण्याविषयीची भीती दूर झाली नाही तर आयुष्यात ही भीती कधीच माझी पाठ सोडणार नाही, असं त्यांनी वारंवार सांगितलं. हा सीन आम्ही खोपोली येथे केलं असून येथे सैन्य भरतीसाठी येणाऱ्या जवानांना प्रशिक्षण दिलं जातं. हा सीन एका ३० फूट खोल स्वीमिंग पूलमध्ये शूट करण्यात आला आहे.

दरम्यान, चित्रपटाची कथा राजस्थानमधील कोटा येथे एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेभोवती फिरताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये राणी खऱ्या अर्थाने मर्दानी रुपात पाहायला मिळत आहे. तिचा लूक आणि स्मार्टनेस तिच्या भूमिकेसाठी अत्यंत साजेसा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन गोपी पुत्रन करत असून निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत. यश राज फिल्म्सअंतर्गत चित्रीत होणारा हा चित्रपट १३ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.