राणी मुखर्जी बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिने आपल्या चित्रपटांमधून महिला नायिकेची भूमिका साकारताना अनेकदा स्वत:मधील अप्रतिम अभिनयाचे प्रात्यक्षिक घडवून दिले आहे. ‘युवा’मधील साक्षी, ‘वीर-जारा’मधील सामिया, ‘हे राम’मधील अपर्णा, ‘ब्लॅक’मधील मिशेल मॅकनाली, ‘हिचकी’मधील नयना माथूर, ‘नो वन किल्ड जेसिका’मधील मीरा गैती, या भूमिकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. हीच राणी आता ‘मर्दानी – २’ या नायिका प्रधान चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने आजवर सादर केलेल्या स्त्री व्यक्तिरेखांचं मनोगत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाली राणी मुखर्जी ?

“मी नेहमीच माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून महिलांची शक्ती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी मिळालेल्या प्रत्येक संधीचा मी सदुपयोग केला. ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘ब्लॅक’, ‘मर्दानी’, ‘हिचकी’ यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून मिळालेल्या भूमिकांना मी संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच त्या भूमिका संस्मरणीय ठरू शकल्या. माझ्यासाठी प्रत्येक महिला ही तिचे कुटुंब, समाज, पती, मुले यांच्यासाठी एक आधारस्तंभ असते. तरीही आपल्या समाजात स्त्रियांचा योग्य सन्मान राखला जात नाही.”

मर्दानीमधील तिची भूमिका इतकी लोकप्रिय का ठरली ?

“मर्दानीमध्ये तिने साकारलेली व्यक्तिरेखा तिच्या मन मर्जीनुसार जीवन जगत असते. कुठल्याही प्रकारचे पूर्वग्रह आणि साचेबद्ध जीवन ती जगत नाही. पुरुषप्रधान समाजात ती बॉस म्हणून वावरते आणि आपल्या कामाचा लक्षणीय ठसा उमटवण्याचा प्रयत्न करते. ती एका महिलेचा कणखर स्वभाव प्रकट करून दाखवत असल्यामुळेच अनेक लोकांना भुरळ घालते.”
‘मर्दानी – २’ या चित्रपटात राणी शिवानी शिवाजी रॉय नावाच्या एका निडर आणि प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात राणी अतिशय क्रूरकर्मा असणाऱ्या खलनायकाशी पंगा घेताना दिसणार आहे. हा चित्रपट येत्या १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.