घोगऱ्या आवाजाने नव्वदीच्या दशकात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी राणी मुखर्जी सिद्धार्थ पी. मल्होत्रा याच्या ‘हिचकी’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. राणीने तिच्या आगामी चित्रीकरणाला सुरुवात केली असून, या चित्रपटात ती शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत मिळतात. हिचकीसाठी अनोख्या अंदाजात राणीने चित्रीकरणाला सुरुवात केल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी राणी मुखर्जीचा एक व्हिडिओ ट्विट केला असून, राणी वर्गातील फळ्यावर शुटिंग सुरु झाल्याचे लिहिताना दिसते. तिच्या या अनोख्या अंदाजातील प्रसिद्धीमुळे या चित्रपटात ती शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच पडेल.

यापूर्वी राणीने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर राणीने कुटुंबाकडे आणि मुलीकडे अधिक लक्ष देण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर ती पुन्हा एकदा चित्रपटामध्ये काम करण्यास सज्ज झाली. ‘हिचकी’मध्ये राणी एक प्रेरणादायी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती. मात्र, ती या चित्रपटात नक्की कोणती भूमिका साकारणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्हिडीओतून मिळणाऱ्या संकेतानुसार, जर तिने शिक्षिकेची भूमिका साकारली तर या धाटणीचा तिचा हा पहिला चित्रपट ठरेल.

यापूर्वी आगामी चित्रपटाविषयी राणी म्हणाली होती की, “मी अशा संहितेच्या शोधात होती जी आव्हानात्मक असेल. तेव्हाच माझ्याकडे ‘हिचकी’ची संहिता आली. प्रत्येकाच्या आयुष्यात कमकुवत बाजू असते. ज्यामुळे तुम्ही मागे खेचले जाता. अशा मागे खेचणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी या गोष्टींकडे उचकी सारखे पाहिले पाहिजे. या विचारामुळे तुम्ही अर्धी लढाई जिंकता.” ‘हिचकी’ हा चित्रपट सकारात्मक गोष्टीवर आधारित असल्याचेही तिने म्हटले होते.