‘पद्मावत’ चित्रपटाविषयी होणारे वाद आणि सद्यपरिस्थिती पाहता काही केल्या भन्साळींच्या मागे असणारे हे शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाहीये हेच स्पष्ट होत आहे. करणी सेनेचा या चित्रपटाला असणारा विरोध पाहता भन्साळी आणि चित्रपट निर्मात्यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षण मिळण्यासंबंधीची मागणी केल्याचे कळते. या चित्रपटाला होणाऱ्या विरोधामध्ये आता चित्तोडच्या राणी महेंद्र कंवर यांनीसुद्धा उडी घेतली आहे. भन्साळी सर्वसामान्य जनतेला फसवत असून, त्यांनी या चित्रपटासंबंधी मेवाडच्या महाराणांशी विचारविनिमय करायला हवा होता, असे मत त्यांनी मांडले.

‘पद्मावत’ या चित्रपटाचे पेड प्रीव्ह्यू प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतानाच ‘राणी सां’चे हे वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधत आहे. जवळपास २०० राजपूत महिलांनी ‘पद्मावत’चा विरोध करण्यासाठी राजस्थानमध्ये निदर्शने केल्यानंतर राणी महेंद्र कंवर यांनी ‘मिड डे’शी संवाद साधताना याविषयीची माहिती दिली.

‘येथील स्थानिक वितरकांनी राजस्थानमध्ये पद्मावत प्रदर्शित न करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. ते स्वत:सुद्धा या चित्रपटाला विरोध करतात’, असे त्या म्हणाल्या. दीपिका, रणवीर आणि शाहिदची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पद्मावत’ला राजस्थानमध्ये प्रवेश देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही कायद्याचा मान राखतो. पण, समाजातील महिलांचा सन्मानही आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

कर्ता, कर्म आणि ‘करनी’

‘जर हा चित्रपट काल्पनिक असल्याचे भन्साळी सांगत आहेत तर त्यामध्ये असणाऱ्या पात्रांची नावे अलाउद्दीन खिल्जी, रावल रतन सिंह अशी कशी असू शकतात? भन्साळी सर्वांची फसवणूक करत आहेत. चित्रपटाविषयी ते प्रामाणिक असते तर त्यांनी याविषयी मेवाडचे महाराणा, अरविंद सिंह यांच्याशी चर्चा केली असती’, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे आता राजस्थानमध्ये ‘पद्मावत’च्या स्क्रीनिंगपुढे हे एक मोठं संकटच आहे, असे म्हणावे लागेल.