अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियाद्वारे स्टार किड्सवर जोरदार टीका होत आहे. या घराणेशाहीच्या वादावर आता अभिनेते रणजीत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘सिलसिला’ या चित्रपटात आधी परवीन बाबी झळकणार होत्या. पण रातोरात निर्मात्यांनी त्यांना चित्रपटातून बाहेर केलं अन् त्या जागी जया बच्चन यांची वर्णी लागली, असा घराणेशाहीचा किस्सा त्यांनी सांगितला.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य केलं. ते म्हणाले, “बॉलिवूडमध्ये घराणेशाही गेल्या अनेक दशकांपासून आहे. सुरुवातीला त्याचं प्रमाण कमी होतं, पण जसजशी सिनेसृष्टी वाढत गेली तसतशी घराणेशाही अधिक प्रकर्षणाने दिसू लागली. मला आठवतंय ‘सिलसिला’ या चित्रपटात आधी परवीन बाबी झळकणार होत्या. पण निर्मात्यांच्या हितसंबंधांमुळे त्या जागी जया बच्चन यांची वर्णी लागली. ‘शोले’ या चित्रपटातही असंच काहीस घडलं होतं. डॅनी यांना शोलेमध्ये काम करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्या व्यक्तिरेखासाठी मला विचारलं गेलं. पण मी देखील काही कारणांमुळे नकार दिला. मग ती व्यक्तिरेखा तिसऱ्या एका अभिनेत्याने साकारली.” असे अनुभव रणजीत यांनी सांगितले.

आणखी वाचा : घराणेशाहीच्या स्तंभावर कंगनाचं करिअर उभं असल्याचं म्हणणाऱ्या नगमाला सडेतोड उत्तर 

या मुलाखती दरम्यान त्यांनी बॉलिवूडमधील ग्रुपीजमवर देखील निशाणा साधला. “या सिनेसृष्टीत अनेक ग्रुप आहेत. त्यामुळे ठराविक दिग्दर्शकांच्या चित्रपटात तुम्हाला ठरावीक कलाकार हमखास दिसतात. यांना ते ट्युनिंगचं नाव देतात. पण असं काहीही नसतं. एक उत्तम कलाकार कुठल्याही ग्रुपमध्ये असो तो उत्तम कामच करतो. नव्या कलाकारांनी ग्रुपीजमच्या फंद्यात न पडता जिथं चांगलं काम मिळेल तिथं करावं. त्यामुळे तुम्ही एक परिपूर्ण कलाकार होऊ शकता.” असंही ते म्हणाली.