रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे गाणे गाऊन रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांच्या सर्वत्र चर्चा सुरु आहेत. जवळजवळ ६० वर्षांपूर्वी त्यांचा जन्म एका चांगल्या कुटुंबामध्ये झाला होता. पण दुर्दैवाने त्यांना आपल्या आई-वडिलांना सोडावे लागले होते. त्यानंतर त्यांनी लोकप्रिय बॉलिवूड स्टार फिरोज खान यांच्या घरी काम करणाऱ्या बबलू मंडलसोबत लग्न केले. काही दिवसानंतर त्या बबलूसोबत मुंबईमध्ये आल्या. परंतु २००३ मध्ये बबलूचे निधन झाले.

बबलूचे निधन झाल्यानंतर त्या पुन्हा पश्चिम बंगालमध्ये परतल्या आणि रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी गाणे गाऊ लागल्या. विशेष म्हणजे १० वर्ष असेच आयुष्य जगत असलेल्या रानू यांचा आवाज अतींद्र चक्रवर्ती या सॉफ्टवेअर इंजिनिअरने राणाघाट येथे ऐकला आणि त्याने रानू यांच्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. त्याना बॉलिवूड अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगामी चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली आणि रानू रातोरात स्टार झाल्या.

नुकताच रानू यांनी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या मनातील काही गोष्टी सांगितल्या आहेत. ‘माझ्या आयुष्याची कथा ही फार मोठी आहे. माझ्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्माती होऊ शकते. जर अशा चित्रपटाची निर्माती झाली तर तो खास चित्रपट असेल’ असे रानू यांनी म्हटले आहे.

रानू यांनी हिमेश रेशमियाच्या ‘हॅप्पी हार्डी अॅन्ड हीर’ या चित्रपटातील ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले आहे. हे गाणे रेकॉर्ड करताचा रानूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गाण्यासाठी जवळपास सहा ते सात लाख रुपये मानधन दिले असल्याचे म्हटले जात आहे. तसेच बॉलिवूडचा दबंग खान सलमानने रानू यांना घर भेट म्हणून दिले असल्याचे म्हटले जात होते. परंतु रानू यांनी त्यांना अशी कोणतीही भेट मिळाली नसल्याचे सांगितले आहे. ‘मी आता पर्यंत सलमानला भेटले नाही. परंतु त्याचा तेरे नाम हा चित्रपट चांगला होता आणि मला तो आवडतो’ असे त्यांनी म्हटले आहे.