सोशल मीडियामुळे कधी कुणाच्या आयुष्याला कलाटणी मिळेल हे सांगता येत नाही. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे रेल्वे स्थानकांवर गाणे गाऊन आपले जीवन जगणारी रानू मंडल. रानू मंडलचा लता मंगेशकर यांचे गाणे गाणाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तिचा आवाज ऐकून बॉलिवूड अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात रानूला गाणे गाण्याची संधी दिली. त्यानंतर आता रानूचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रानू तिची संपूर्ण कथा सांगत आहे.

नुकताच रानू टीव्ही रिअॅलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर’मध्ये पाहुणी म्हणून पोहोचली होती. दरम्यान तिने रेल्वे स्थानकांवर गाणे गाण्यास सुरुवात का केली होती असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. तेव्हा तिने तिला राहण्यास घर नसल्यामुळे रेल्वे स्थानकावर गाणे गाऊन तेथेच राहत असल्याचा खुलासा केला. तिचे गाणे ऐकून कधी लोक तिला बिस्किट देत तर कही लोक पैसे देत असे. असे पैसे गोळा करुन रानू तिचा उदर्निवाह करत असे. तसेच रानूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे १० वर्षांपासून संपर्कात नसलेली तिची मुलगी तिला पुन्हा भेटली असा खुलासा देखील रानूने केला आहे.

दरम्यान हिमेश रेशमियाने रानूला त्याच्या आगमी चित्रपटात गाण्याची विनंती केली. ‘सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी मला एक मोलाचा सल्ला दिला होता. आयुष्यात कधीही एखादी प्रतिभावान व्यक्ती भेटली तर तिला आपल्या संपर्कातून जाऊ देऊ नका’ असे हिमेश म्हणाला. त्यांचा हा सल्ला लक्षात ठेवता हिमेशने रानूला त्याचा आगमी चित्रपटात ‘हॅप्पी हार्डी अॅन्ड हीर’मध्ये गाण्याची संधी दिली आहे. प्रत्येक कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सलमान खानची मदत घेत असते. रानूला अप्रत्यक्षपणे सलमान कनेक्शनमुळेच प्रसिद्धी मिळाली आहे.

पतीच्या मृत्यूनंतर उदर्निवाह करण्यासाठी रानू वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर गाणे गात असे. गाणे गाऊन मिळणाऱ्या पैशातून ती तिचे पोट भरत असे. काही दिवसांपूर्वी रानूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रानू रेल्वे स्टेशनवर भारतातील दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे गाणे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि रानू रातोरात स्टार झाली. तिचा सुरेल आवाज ऐकून अनेक गाण्याच्या ऑफर तिला येऊ लागल्या. दरम्यान तिला गाणे गाण्यासाठी कोलकत्ता, केरळ आणि बांगलादेशमध्ये बोलवण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.