सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे संपूर्ण आयुष्य बदलेल्या गायिका म्हणजे रानू मंडल. त्यांनी बॉलिवूड अभिनेता, गायक हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटात ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या गाण्यानंतर रानू यांची बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. तसेच या गाण्यातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावरही जादू केली. आता रानू मंडल यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रानू बंगाली भाषेमध्ये गाणे गाताना दिसत आहेत.

कोलकातामधील दुर्गा पूजे निमित्त रानू मंडल यांनी बंगाली मध्ये एक खास गाणे रेकॉर्ड केले आहे. सध्या त्यांच्या या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हे गाणे रानू यांच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी रेकॉर्ड केले असल्याचे म्हटले जात आहे. हे दुर्गा पूजा स्पेशल गाणे प्रीतम डे यांनी लिहिले आहे.

रानू मंडल यांचा रेल्वे स्थानकांमध्ये गाणे गाण्यापासून ते बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायिका हा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. त्यांचा हा जीवनप्रवास ऐकून प्रेरीत झालेल्या चित्रपट निर्माता ऋषिकेश मंडलने रानू मंडल यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. ऋषिकेशने चित्रपटातील रानू यांच्या भूमिकेसाठी दाक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्तीची निवड केली आहे.

या चित्रपटाचे नाव ‘प्लॅटफॉर्म सिंगर रानू मंडल’ असे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘रानू मंडल यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सोशल मीडीयाने त्यांना रातोरात इंटरनेट सेंसेशन बनवले आहे. रानू मंडल यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांना पाहायचा आहे. तसेच चित्रपटात सोशल मीडियाची ताकददेखील दाखवण्यात येणार आहे’ असे चित्रपट निर्माता ऋषिकेश म्हणाला आहे.