सोशल मीडियावर लता मंगेशकर यांचे गाणे गावून रातोरात प्रकाशझोतात आलेल्या गायिका रानू मंडल यांचे ‘तेरी मेरी कहानी’ हे गाण बुधवारी प्रदर्शित झाले. गाणे प्रदर्शित होताच रानू मंडल यांनी लता मंगेशकर यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.

“मी कोणाच्याही आवाजाची नक्कल केली नाही. मी माझ्याच आवाजात गाणे गायले आहे. असे म्हणत राणू मंडल यांनी लता मंगेशकर यांना उत्तर दिले. दरम्यान, “लता मंगेशकर या खुप मोठ्या गायिका आहेत. त्यांचे गाणे ऐकून अनेक जणांना गायक होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असेल. परंतु ते सर्व लोक कोणाचीही नक्कल करतात असे म्हणता येणार नाही”, असे म्हणत हिमेश रेशमियाने देखील रानू मंडल यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.

काय आहे प्रकरण?

रेल्वे स्थानकांवर गाणे गाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या रानू मंडल यांचा सोशल मीडियावर गाणे गाताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधून रातोरात गायिका झालेल्या रानू मंडल यांना बॉलिवूडमधील संगीतकार हिमेश रेशमियाने त्याच्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली. या गाण्याचा ट्रेलर इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय झाला होता. परंतु रानू यांच्या गाण्याच्या शैलीवर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी टीका केली होती. “मी गायलेली गाणी गाऊन, माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कुणाचे भले झाले तर मी स्वतःला भाग्यवान समजते. मात्र कोणाची नक्कल करुन मिळणारी प्रसिद्धी दीर्घकाळ टिकत नाही”, असे लता मंगेशकर म्हणाल्या होत्या.