अभिनेता रणवीर सिंगने ‘गली बॉय’ या चित्रपटातून स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या प्रसिद्ध रॅपर डिव्हाइनची कथा मांडली. या चित्रपटामध्ये त्याने वठविलेल्या भूमिकेमुळे प्रेरित होऊन झोपडपट्टीसारख्या ठिकाणी राहणाऱ्या आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्यांसाठी आशेचा किरण म्हणून रणवीरने एक खास मंच दिला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने स्वतंत्र म्युझिक रेकॉर्ड लेबल ‘इंक इंक’ लाँन्च केलं. त्यानंतर आता या म्युझिक रेकॉर्ड्समधील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे हे गाणं गणपती बाप्पाला समर्पित करण्यात आलं आहे.

‘गणपती आला रे’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून काम भारी या नावाने ओळखला जाणारा कुणाल पंडागळे याने हे गाणं शब्दबद्ध केलं आहे. या गाण्यामधून बाप्पाच्या आगमनाचा आनंद स्पष्टपणे जाणवत आहे.


गणेशोत्सवात बाप्पाचे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात होते, त्याचा गौरव या गाण्यातून करण्यात आला आहे. बाप्पा येताना सोबत पाऊस घेऊन येतो, त्यामुळे दुष्काळाची चिंता मिटून मनात आशा पल्लवित होते. विघ्नहर्ता संधींची पालवी फुलवतो. या आनंद-समाधानात आकंठ न्हाऊन निघण्याविषयी व अधिकाधिक उज्ज्वल संधी व आगामी समृद्ध काळासंबंधी भाव या गाण्यातून प्रतीत होतो.

“या गीतामधील जल्लोषपर संदेशाला सांगीतिक साथसंगीताची जोड मिळून एक ट्रॅक तयार झाला आहे. काम भारीच्या गीताचे बोल आणि सकारात्मक संगीताच्या मिश्रणामुळे गणपती बाप्पाचे स्वागत करण्याची उत्सुकता सुंदर पद्धतीने व्यक्त होते. बाप्पा येताना सोबत पाऊस घेऊन येतो, जो तुमची दु:ख आणि चिंता वाहून नेतो. तो आपल्या मनात सकारात्मकता आणि आशेचा किरण जागवतो. या व्हिडीओत काम भारी जंगलातून चालतो आणि मातीपासून घडविण्यात आलेल्या मूर्तीची आराधना करतो, जेणेकरून शहरात हिरवाईने पर्यावरणाला जपण्याचा, त्याचे संवर्धन करण्याचा संदेश सोप्यारितीने मांडला आहे. थोडक्यात, मनुष्य, पशु-पक्षी आणि निसर्गमातेमधील जीवनरुपी अंश साजरा करण्याचा विचार हे गीत व्यक्त करते,” असं रणवीरने या गाण्याविषयी सांगितलं.

दरम्यान, रणवीरने चित्रपटाचे निर्माते आणि संगीत रसिक नवजार इरानी यांच्यासोबत मिळून हे लेबल लाँन्च केलं आहे. ‘इंक इंक’ने आपल्या पहिल्या सिंगल व म्युझिक व्हिडिओ जहरचदेखील यावेळी अनावरण केले होतं.