व्हॅलेंटाइन डेला रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गली बॉय’ प्रदर्शित झाला. देशभरातील ३३५० स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची गर्दी खेचली. सुट्टीचा दिवस नसतानाही ‘गली बॉय’ने पहिल्या दिवशी घसघशीत कमाई केली आहे.

गुरुवारी ‘गली बॉय’ने १८.७० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आठवड्याअखेर हा चित्रपट जोरदार कमाई करेल अशी अपेक्षा आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा आहे.

मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. चित्रपटात रणवीर आणि आलियाची केमिस्ट्री सर्वाधिक लक्ष वेधून घेत असल्याचं मत प्रेक्षकांनी व्यक्त केलं. सोशल मीडियावरही सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट कमाईचे कोणते विक्रम रचणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.