रणवीर सिंग, आलिया भट्ट यांचा ‘गली बॉय’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलिजची तारीख आज जाहीर करण्यात आली. ९ जानेवारी रोजी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा ‘गली बॉय’मध्ये पाहायला मिळणार आहे. ट्रेलर रिलिजची तारीख जाहीर करताना प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये रणवीर सिंग एक रॅप साँग गाताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओवरून एकंदरितच सिनेमामधील प्रत्येक भूमिकेची झलकही दाखवण्यात आली आहे.

‘गली बॉय’चं बरचंस चित्रिकरण हे धारावीमध्ये करण्यात आलं आहे. आज प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्येही हे स्पष्टपणे दिसून येतं. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंग, आलिया भट, कल्की कोचलिन, अमृता सुभाष असे सर्वच कलाकार दिसत आहेत. ट्विटसहीत सर्वच सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा दिसून येत आहे. ट्विटवर सकाळपासूनच #GullyBoy आणि #AsliHipHop हे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. रणवीर सिंग, अभिषेक बच्चन, अर्जून कपूर, आलिया भट, करण जोहर, अशा अनेक कलाकारांनी हा व्हिडीओ शेअर केल्याने हे हॅशटॅग ट्रेण्डिंग होताना दिसत आहेत. तुम्हीच पाहा रॅप साँग गातानाचा रणवीरचा हा ट्रेलर लॉन्चची तारीख जाहीर करण्यासाठी तयार करण्यात आलेला व्हिडीओ…

‘गली बॉय’ हा चित्रपट येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. झोया अख्तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.