बिग बजेट सिनेमासाठी आवश्यक असणारे सर्व निकष आणि त्यासाठी लागणारी कलाकारांची फळी या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करण्याची कला भन्साळींना चांगलीच अवगत आहे. याचाच प्रत्यय ‘पद्मावत’ सिनेमातून पुन्हा एकदा आला. राजपूत संस्कृती आणि एका काल्पनिक कथानकाची साथ घेत साकारण्यात आलेल्या या सिनेमातून दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. दीपिकाने साकारेली राणी पद्मावती, रणवीरने साकारलेला क्रूर सुलतान अलाउद्दीन खिल्जी आणि शाहिदने साकारलेला महारावल रतन सिंह या मुख्य भूमिकांमध्ये शेवटपर्यंत लक्षात राहतो तो रणवीर सिंग.

सध्या प्रत्येकाच्याच तोंडी खिल्जी साकारलेल्या रणवीर सिंगचेच नाव आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार रणवीरला अभिनंदनाचे फोन आणि मेसेज करत असताना, खुद्द रणवीरने बॉलिवूडच्या किंग अर्थात शाहरुख खानला हा सिनेमा पाहिला का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, अरे माफ कर मी तुला ओळखलेच नाही. आता तू माझ्यासाठी खिल्जी आहेस असे उत्तर दिले. किंग खानला हा सिनेमा फारच आवडलेला दिसतोय. त्यातही त्याला रणवीरचा अभिनय अधिक भावला. मला हा सिनेमा खूप आवडला अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

दरम्यान, वाद आणि विरोधाचं सावट असतानाही ‘पद्मावत’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं. सोमवारीच या सिनेमाच्या खात्यात १५ कोटींची कमाई झाली होती. त्यानंतर बुधवारी या सिनेमाने १२. ५ कोटींची लक्षवेधी कमाई केली असून, आता हा आकडा १५५.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ‘पद्मावत’ची घोडदौड अशीच सुरु राहिली तर येत्या काळात हा सिनेमाही अनेक विक्रम रचू शकतो आणि काही विक्रम मोडित काढू शकतो असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. Boxofficeindia.com च्या माहितीनुसार भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची कामगिरी पाहता येत्या काळात ‘पद्मावत’ २०० कोटींच्या आकडा सहज पार करेल.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणताच मोठा सिनेमा प्रदर्शित होत नसल्यामुळे त्याचाही फायदा ‘पद्मावत’ला होणार हे नाकारता येणार नाही. तेव्हा आता येत्या काळात भव्यता आणि कल्पनाशक्तीच्या परिसीमा ओलांडणाऱ्या या सिनेमाच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले असणार यात शंका नाही.