२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून चित्रीकरणाच्या शेवटच्या क्षणी रणवीर सिंगला चक्क रडू कोसळलं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी याविषयी माहिती दिली.

प्रत्येक खेळाडू त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कित्येक वर्ष तयारी करत असतो. तशीच तयारी आम्हीदेखील ’83’साठी केली होती. हा चित्रपट तयार करण्यासाठी आम्हाला जवळपास २ वर्षांपेक्षा अधिक काळ लागला. या चित्रपटामध्ये आम्ही जे काही दाखवू ते पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर तो जुना काळ उभा राहिला पाहिजे अशी आमची इच्छा होती, असं कबीर खान म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट खरी भासावी यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न केले. म्हणूनच चित्रपटाचं चित्रीकरणही लंडनमधील लॉर्डसच्या मैदानावर झालं. इतकंच नाही तर चित्रपटाच्या शेवटी रणवीर सिंगच्या हातामध्ये १९८३मध्ये जिंकलेला विश्वचषक देण्यात आला होता. विशेष म्हणजे हा विश्वचषक पाहून रणवीर प्रचंड भावूक झाला आणि त्याला रडू कोसळलं. हा सीन पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी कट असं म्हणालो तेव्हा रणवीर अचानकपणे रडू लागला’.

दरम्यान, ‘83 ’ या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.