अभिनेता रणवीर सिंग त्याच्या क्रिकेट टीमसह ’83’ चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. चित्रपटात कर्णधार कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारणारा रणवीर काही दिवस त्यांच्या घरी राहून भूमिकेची तयारी देखील करत होता. क्रिकेटविश्व पूर्णपणे जाणून घेण्यासाठी सध्या रणवीर अनेक दिग्गज खेळाडूंच्या भेटी घेत आहे. सध्या वर्ल्डकप २०१९ची रणधुमाळी सुरु असताना एका कार्यक्रमात रणवीरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सर विवियन रिचर्डस् व वसीम अक्रम यांची भेट घेतली. क्रिकेटविश्वातील देवांना भेटल्याचे हे क्षण रणवीरने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केले आहेत.

रणवीरने नुकतीच तेंडुलकर, रिचर्ड्स व अक्रम यांची स्वाक्षरी असलेली एक बॅट विकत घेतली आहे. या बॅटची किंमत २००० पाऊन्ड म्हणजेच १ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे. लिलावात ही बॅट घेण्याची संधी रणवीरने सोडली नाही. बॅट विकत घेताच आठवणीने त्याने क्रिकेटविश्वातील महान खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या बॅटवर घेतल्या.

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. ‘83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. “या चित्रपटात काम करणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे.” असं रणवीर म्हणाला.