प्रत्येक सिनेमात वेगवेगळी व्यक्तीरेखा साकारण्याकडे अनेक कलाकारांचा कल असतो. यात रणवीर सिंगही काही वेगळा नाही. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला तोडीस तोड टक्कर देण्यास रणवीर तयार झाला आहे असेच म्हणावे लागेल. ‘पद्मावत’ सिनेमासाठी त्याने क्रूर आणि निर्दयी खलनायकाची भूमिका साकारल्यावर आता तो ‘गली बॉय’ सिनेमात एका निरागस मुलाची व्यक्तिरेखा साकारायला सज्ज झाला आहे.

नुकताच रणवीरने सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणवीरला ‘पद्मावत’मधील अलाउद्दीन खिल्जीपासून ‘गली बॉय’तील भूमिकेसाठी शरीरयष्टीत करावा लागलेला बदल सहज पाहायला मिळतोय. त्याच्यातला हा बदल तितकाच थक्क करणारा आहे. फोटोमध्ये एकीकडे पिळदार शरीरयष्टी कमावलेल्या रणवीरचा हा लूक ‘पद्मावत’मध्ये दिसणार आहे तर दुसरीकडे सडपातळ अंगकाठीमधला लूक ‘गली बॉय’मध्ये दिसणार आहे. या बदलासाठी रणवीरला फार मेहनत घ्यावी लागली असणार यात काही शंकाच नाही.

झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ सिनेमातील रणवीर आणि आलिया भट्टचा लूक काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. मुंबईतील एका झोपडपट्टी परिसरात या सिनमाचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. आलिया या फोटोंमध्ये हिजाब ओढलेली दिसत आहे. तर रणवीरचा लूक फारच साधा आहे. त्याचा हा लूक पाहून ‘बँड बाजा बारात’ सिनेमातील त्याच्या लूकची आठवण येते.

झोया अख्तरच्या या सिनेमाच्या निमित्ताने रणवीर आणि आलिया पहिल्यांदाच एका सिनेमात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या दोन्ही कलाकारांचा उत्साह आणि एकंदर त्यांच्या अभिनयाची शैली पाहता त्यांच्या भूमिका हे दोघेही चांगलीच वठवतील यात शंका नाही.