17 December 2017

News Flash

या खलनायकांची आठवण करुन देतो रणवीरचा खिल्जी

काहीजण त्याला या लूकमध्ये पाहून त्याचा राग करु लागले आहेत

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 10, 2017 3:02 PM

ऐतिहासिक कथानक असलेल्या ‘पद्मावती’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सर्वात जास्त लक्षात राहिला तो अल्लाउद्दीन खिल्जी अर्थात रणवीर सिंग. अनेकांनी रणवीरच्या या सिनेमातील लूकची प्रशंसा केली. तर काहीजण त्याला या लूकमध्ये पाहून त्याचा राग करु लागले आहेत. पण यातही शेवटी रणवीरचे यश लपलेले आहे. रणवीरने या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे. रणवीरचा हा लूक पाहून बॉलिवूडमधील आणखी काही खलनायकांची आठवण होते ज्यांना आपण आजही विसरु शकलो नाही.

बॉलिवूडमध्ये जेव्हाही खलनायकांचा विषय निघतो तेव्हा सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो ‘शोले’ सिनेमातला गब्बर. गब्बर या व्यक्तिरेखेला अजरामर करणारे अभिनेते अमजद खान हे असे खलनायक होते जे नायकापेक्षाही जास्त प्रसिद्ध होते. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ सिनेमात अमजद यांनी गब्बर सिंगची व्यक्तिरेखा साकारली होती.

१९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शान’ सिनेमातील शाकाल ही व्यक्तिरेखा तर माहितीच असेल. अभिनेते कुलभूषण खरबंदा यांनी या व्यक्तिरेखेसाठी केलेल्या टक्कलाची खूप चर्चा रंगली होती. त्यांनी साकारलेल्या शाकालने अनेकांची झोप उडवली होती. आपल्या शत्रुंना जंगली कुत्र्यांसमोर टाकून आपला सूड घेणाऱ्या या खलनायकाला आजही कोणी विसरलेले नाही.

‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील अमरीश पुरी यांचा मोगँबो लूक कोण विसरु शकतं. या सिनेमासाठी आजही अमरीश यांची आवर्जुन आठवण काढली जाते. सिनेमात त्यांनी ज्या पद्धतीने संवाद म्हटले आहे त्याचीही तेव्हा फार प्रशंसा करण्यात आली होती. शेखर कपूर दिग्दर्शित १९८७ मध्ये आलेल्या या सिनेमात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मुख्य भूमिका होत्या.

‘अग्निपथ’ हा सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात ऋषी कपूर यांनी रऊफ लाला ही व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमातील त्यांचा लूक फारच क्रूर दाखवण्यात आला होता. सिनेमाच्या प्रदर्शनावेळी त्यांच्या लूकची फार चर्चाही झाली होती. अमिताभ बच्चन यांच्या अग्मिपथ सिनेमाचा हा रिमेक होता. या सिनेमात हृतिक रोशन आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका होत्या.

याच सिनेमात संजय दत्तने कांचा ही खलनायकी भूमिका साकारली होती. आतापर्यंत कधीही न दिसलेला संजय या सिनेमात दिसला होता. समीक्षकांनी संजयच्या लूकचे आणि अभिनयाचे फार कौतुक केले होते. या सिनेमात संजयच्या भूमिके एवढेच महत्त्व हृतिक रोशन आणि ऋषी कपूर यांच्या भूमिकांना होते.

शबाना आझमी यांचा ‘मकडी’ हा सिनेमा २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. विशाल भारद्वाज यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमात शबाना यांनी एका चेटकीणीची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेची समीक्षकांकडून प्रशंसा करण्यात आली होती.

‘बाहुबली’तील भल्लालदेवला कोण विसरु शकतं का? राणा डग्गुबतीने साकारलेल्या या भूमिकेच्या आजही अनेकजण प्रेमात आहेत. बाहुबलीसोबतच भल्लालदेवच्या लूकची फार प्रशंसा झाली होती.

First Published on October 10, 2017 3:02 pm

Web Title: ranveer singh look padmavati horrible villain of bollywood photos