26 March 2019

News Flash

…म्हणून रणवीरने सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यांना केली धक्काबुक्की

रणवीरसोबत सेल्फी घ्यायला फार मोठी रांग लागली

‘पद्मावत’सारखा हिट सिनेमा केल्यानंतर सध्या रणवीर सिंग ‘गली बॉय’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. चित्रीकरणामध्ये रणवीर कितीही व्यग्र असला तरी तो चाहत्यांसोबत वेळही घालवतो. अनेकदा त्याला भर रस्त्यात चाहत्यांना सेल्फी देताना पाहण्यात आले आहे. त्याच्या याच गुणांनी अनेकजण त्याचे दिवाने आहेत. पण त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो* जीममधून बाहेर येताना दिसतो. त्याच्यासोबत एक सेल्फी घेता यावा म्हणून त्याचे अनेक चाहते जीमच्या बाहेर उभे असलेले दिसतात. रणवीर तिथे जाऊन प्रत्येकासोबत सेल्फी काढतो पण जे चाहते एकाहून जास्त सेल्फी घेण्याच्या आणि व्हिडिओ काढण्याच्या प्रयत्नात होते, त्यांना रणवीर धक्का मारून बाजूला सारत होता. रणवीरचा हा व्हिडिओ सीडीएस इंडिया या यूट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आला.

पिंकविलाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, तिथे उपस्थित एकाने सांगितले की, ‘रणवीर जिममधून निघताना फार चांगल्या मूडमध्ये होता. तो चाहत्यांना सेल्फी देण्यासाठी थांबलाही पण काही चाहत्यांनी फोटो घेण्याएवजी त्याच्यासोबत व्हिडिओ घ्यायला सुरूवात केली. तर काहींनी एकाहून जास्त सेल्फी घ्यायला सुरूवात केली. यामुळे रणवीर आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांना फार त्रास सहन करावा लागत होता. रणवीरसोबत सेल्फी घ्यायला फार मोठी रांग लागली असल्यामुळे रणवीर एक सेल्फी दिल्यानंतर चाहत्यांना पुढे जाण्यास सांगत होता. वाढती रांग पाहून थोड्या वेळात रणवीरने तिकडून काढता पाय घेतला. त्यामुळे अनेकांना त्याच्यासोबत सेल्फी घेता आला नाही.’

रणवीरच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ सिनेमात तो एका रॅपरची भूमिका साकारत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्टचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पुढच्या वर्षी १४ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

First Published on March 14, 2018 5:36 pm

Web Title: ranveer singh pushes fans away after being ambushed selfie watch video