‘मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’ असं ज्या युद्धाचं वर्णन केलं जातं त्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा थरार आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. नुकताच या चित्रपटाला ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र सदाशिवरावांच्या भूमिकेतील अर्जुन कपूर काहींना रुचला नाही. त्याच्याऐवजी रणवीर सिंग किंवा दुसऱ्या अभिनेत्याची निवड करावी अशी मागणी काही प्रेक्षकांनी केली आहे. रणवीरने याआधी ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ यांसारख्या ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती ही रणवीरला फार मिळत आहे. अशातच ‘पानिपत’च्या ट्रेलरवर खुद्द रणवीरची काय प्रतिक्रिया असणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक होते.

रणवीर व अर्जुन हे एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. त्यामुळे इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना त्याने आवर्जून अर्जुनचा उल्लेख केला. इन्स्टाग्रामवर लाइव्ह असताना रणवीर अत्यंत उत्साहात म्हणाला, ”..आणि सदाशिव भाऊ इथे आहेत.” ट्रेलरची प्रशंसा करत तो पुढे म्हणाला, ”अत्यंत दमदार ट्रेलर आहे.”

#PanipatTrailer: ”मराठा, जिनके लिए उनका धर्म और कर्म उनकी वीरता है”

‘पानिपत’च्या ट्रेलरमधून मराठा सैन्य ज्यांच्या नेतृत्वाखाली शौर्यानं लढलं त्या सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेतील अभिनेता अर्जुन कपूर, अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीच्या भूमिकेतील संजय दत्त, सौंदर्य आणि शौर्य यांचा मिलाफ असलेल्या पार्वती बाईंच्या भूमिकेतील अभिनेत्री क्रिती सेनॉन अशा विविध पात्रांचा परिचय घडवण्यात येतो. येत्या ६ डिसेंबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘पानिपत’ च्या तिसऱ्या युद्धावर आधारित ही कथा आहे. इसवी सन १७६१ मध्ये झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासातलं सर्वांत महत्त्वाचं युद्ध मानलं जातं. पानिपतच्या युद्धाचा थरार या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.