रणवीर सिंग हे नाव जरी वाचलं तरी डोळ्यासमोर येतात त्याचे एकाहून एक हिट सिनेमे. अभिनयातला हुकुमी एक्का असं त्याला बोललं जातं ते काही चुकीचं नाही. पण तो फक्त अभिनयच करु शकतो असे काही नाही, त्याच्यात अजूनही काही कलागुण आहेत. अभिनेता राजकुमार रावने रणवीरचा हा सुप्त गुण सर्वांसमोर आणला आहे. ‘ट्रॅप्ड’ या सिनेमाच्या टीमसोबत नुकतेच रणवीरने एक रॅप गायले आहे. राजकुमारने हा रॅपिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, रणवीरच्या या नव्या कौशल्याचे सध्या सर्वच कौतुक करत आहेत.

रणवीर नुकताच ‘ट्रॅप्ड’च्या टीमला भेटला होता. विक्रमादित्य मोटवानी आणि राजकुमार राव यांच्यासोबत त्याने फेसबुक लाइव्हदेखील केले होते. यावेळी रणवीरने त्यांच्यासोबत ‘रॅपिंग’ केले. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना राजकुमारने, ‘ट्रॅपरॅप’ उद्या येत आहे, हा बघा ‘ट्रॅप्ड’चा बोनस ट्रॅक! असे कॅप्शनही दिले. या व्हिडीओत रणवीर राजकुमारच्या नावालाच चाल देऊन त्याचे नाव गात आहे. त्याचबरोबर बॅकग्राउंड म्युझिक द्यायचे काम खुद्द राजकुमाच करत आहे. रणवीरने राजकुमार राव याचा ‘ट्रॅप्ड’ बघितल्यानंतर तो त्याच्या जणू काही प्रेमातच पडला होता. सोशल मीडियावर राजकुमार राव याचे गोडवे गाताना त्याने एकापाठोपाठ अनेक ट्विट केले होते.

राजकुमार राव याचा ‘ट्रॅप्ड’ हा एक थ्रिलर सिनेमा असून, एक व्यक्ती स्वत:च्या चुकीने त्याच्याच घरात कित्येक दिवस बंद होतो. त्यानंतर तो कशा पद्धतीने जीवन जगतो, याविषयीची कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे.