अभिनेता रणवीर सिंगला नुकत्याच पार पडलेल्या स्टार स्क्रिन अवॉर्ड २०१८ सोहळ्यात सर्वोत्तम अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यातं आलं. ‘पद्मावत’ चित्रपटात रणवीरनं साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. फार कमी संदर्भाच्या आधारावर रणवीरनं खिल्जीची भूमिका उत्तम साकारली होती. या चित्रपटात त्यानं साकारलेल्या भूमिकेचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं होतं. सोहळ्यादरम्यान पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आलेल्या रणवीरनं आपलं मनोगतही व्यक्त केलं.

या भूमिकेसाठी त्याची निवड केल्याबद्दल त्यानं संजय लीला भन्साळींचे मनापासून आभार मानले पण, त्याचबरोबर दीपिकाचं कौतुक केलं. लग्नानंतर पहिल्यांदाच या जोडीनं कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. त्यामुळे रणवीर स्टेजवर काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून होतं. ‘पद्मावत’मध्ये मला राणी मिळाली नाही, पण खऱ्या आयुष्यात मला राणी मिळाली आहे, गेल्या सहा वर्षांत तिनं मला खूप काही दिलं असं म्हणत रणवीरनं दीपिकाचं सर्वांसमोर कौतुक करत आपल्या प्रेमाची कबुली दिली.

https://www.instagram.com/p/BrdUp9sgYZD/

दीपिका आणि रणवीरनं गेल्यामहिन्यात इटलीत विवाहगाठ बांधली. गेल्या सहा वर्षांपासून ते दोघंही एकमेकांना डेट करत होते. संजय लीला भन्साळींच्या रामलीला या चित्रपटापासून दीपिका रणवीरच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली.