‘बँड बाजा बारात’ , ‘राम-लीला’, ‘बाजीराव-मस्तानी’, ‘पद्मावत’ यांसारखे एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट देणारा अभिनेता रणवीर सिंगनं ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय जो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत रणवीर sci-fi चित्रपटात शोभेल अशा लूकमध्ये दिसत आहे.

रणवीरनं शेअर केलेल्या फोटोमुळे अनेकांच्या मनात  कुतूहल निर्माण झालं. विशेष म्हणजे यशराज फिल्मच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो रिपोस्ट करण्यात आलाय. त्यामुळे यशराज फिल्मच्या बॅनरअंर्तगत याची निर्मिती होऊ शकते असा कयास बांधण्यात येत होता.’लवकरच येतोय’ इतकंच ट्विट रणवीरनं केलंय त्यामुळे हा साय फाय चित्रपट आहे की आणखी काय हे जाणून घेण्यास रणवीरचे चाहतेही उत्सुक होते.

मात्र चाहत्यांचं कुतूहल लवकरच क्षमलं कारण हे फोटो चित्रपटातले नसून एका जाहिरातीसाठी चित्रीत करण्यात आले आहेत विशेष म्हणजे या जाहिरातीत रणवीर सोबत करिश्मा तन्नाहीदेखील पाहायला मिळणार आहे. रणवीर एका मसाले आणि सॉसच्या ब्रँडसाठी जाहिरात शूट करत आहे त्यातला हा लूक आहे. मात्र चाहत्यांना रणवीरचा हा फोटो त्याच्या नवीन चित्रपटातला असल्याचं वाटल्यानं चाहतेही खूपच उत्सुक होते, अखेर चाहत्यांची याबाबत निराशा झाली.

नुकतंच रणवीरनं त्यांच्या आमागी चित्रपट ‘सिम्बा’चं चित्रिकरण पूर्ण केलं आहे. पुढील काही महिन्यात तो अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा आहेत.